बार्शी – बार्शी शहरातील अळिपूर रोडवरील भराडिया प्लॉट परिसरात किरकोळ वादातून दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेत दोन्ही बाजूंचे युवक जखमी झाले असून, परस्पर विरोधी दोन तक्रारींवरून बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष भारत देवकर (वय 35) व त्याचा भाऊ सुरज देवकर हे रविवारी (दि. 19 ऑक्टोबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरासमोर उभ्या असलेल्या एर्टीका कार (क्र. MH13 EC 6524) मधून किराणा सामान उतरवत होते. त्यावेळी दारूच्या नशेत शिवम माने हा मोठ्याने हॉर्न वाजवत आला. देवकर यांनी थोडा वेळ थांबण्यास सांगितल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर शिवीगाळ व दमदाटी झाली आणि त्याचे आई-वडील आल्यावर प्रकरण तात्पुरते मिटले.
मात्र, सायंकाळी पुन्हा शिवम माने हा हातात लोखंडी गज घेऊन सार्थक रविंद्र देवकते व दोन अनोळखी युवकांसह तेथे आला. चौघांनी देवकर भावंडांवर हल्ला केला. या दरम्यान संतोष देवकर यांच्या डोक्यावर लोखंडी गजाने प्रहार झाला, तर भाऊ सुरज यालाही मारहाण झाली. महिलांना देखील ढकलून शिवीगाळ करण्यात आल्याचे देवकर यांच्या तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, या घटनेनंतर रात्री उशिरा पुन्हा हल्लेखोरांनी देवकर यांच्या घरासमोर येऊन “तुम्ही पोलिसात तक्रार दिली तरी काही होणार नाही” अशा धमक्या दिल्याचेही संतोष देवकर यांच्या पत्नी पुनम यांनी सांगितले. या प्रकरणी देवकर यांनी शिवम माने, सार्थक देवकते व दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिस तपास सुरू आहे.
दरम्यान, याच घटनेविषयी दुसऱ्या बाजूनेही फिर्याद दाखल करण्यात आली आहे. जखमी सार्थक रविंद्र देवकते (वय 23, रा. व्हनकळस प्लॉट, बार्शी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास शिवम माने याने फोन करून मला भराडिया प्लॉट येथे बोलावले. मी त्याच्या घराजवळ गेल्यावर पप्पु देवकर हा बाहेर येऊन माझ्याशी वाद घालू लागला आणि त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.”
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, “दरम्यान, पप्पु देवकर याचा भाऊ हातात लोखंडी रॉड घेऊन आला आणि माझ्या बरगडीवर तसेच हातावर प्रहार केला. त्यानंतर लाकडी दांडक्याने डोळ्यावर मारहाण करण्यात आली.” गंभीर जखमी अवस्थेत सार्थक देवकते याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले असून, बार्शी शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.