सोलापूर : शहराच्या मध्यवर्ती अशा गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाच्या बस स्टॉप मध्ये मोठे भगदाड पडले आहे. या बस स्टॉपची मोठी दुरावस्था झाली आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
सोलापूर शहरातील नवी पेठ लगत असलेल्या सुभाष चौक (लकी चौक) येथे सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाचे बस स्टॉप अनेक वर्षापासून आहे. वर्दळीच्या ठिकाणी असलेले हे बस स्टॉप प्रसिद्ध आहे. नेहमी या ठिकाणी मोठी गजबज असते. मात्र या बस स्टॉपच्या खालच्या बाजूला खंदक बागेकडे मोठे भगदाड पडले आहे. यामुळे या बस स्टॉप मध्ये थांबणे धोकादायक झाले आहे. रात्री अनावधानाने या भगदाडातून नागरिक खाली पडण्याची मोठी भीती आहे. गेल्या अनेक दिवसापासून याकडे महापालिका परिवहन उपक्रम प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
या बस स्टॉपमध्ये अस्वच्छता आहे. विशेष म्हणजे या बस स्टॉपच्या समोरच वाहने पार्किंग केली जातात. कधी कधी तर या ठिकाणी झाडू वगैरे विक्री केली जाते. शहरातील महत्त्वपूर्ण ठिकाण असलेल्या या बस स्टॉपची दुरावस्था झाली आहे. महापालिका परिवहन उपक्रम सुधारत असतानाच बस स्टॉपकडे मात्र दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नागरिकांमधून होत आहे. तातडीने याकडे लक्ष देऊन या बस स्टॉपची दुरुस्ती करण्याची गरज वर्तवली जात आहे.