सोलापूर – दिवाळी सणाचा गोडवा सर्वत्र दरवळत असताना, शहरातील असा एक वर्ग जो दिवाळीच्या आनंदापासून वंचितच राहत आला आहे. “ना घर..ना दार..ना आडोसा” अशा दयनीय परिस्थितीत रस्त्यावर भिक्षा मागून आपला उदर निर्वाह करणाऱ्यांची ही दिवाळी रस्त्यावरच साजरी होत, असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. शहरात अशा भिक्षेकरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एकीकडे शेतकरी अतिवृष्टी आणि महापुराने बाधित झाल्याने शेतकऱ्यांकडे यंदाची दिवाळी साजरी होत नसल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. त्याच प्रमाणे दुसरीकडे वंचितांची दिवाळी सुद्धा देणेकऱ्यांवर अवलंबून असलेली दिसत आहे.
दरम्यान, शहरातील डफरीन चौक, मेडिकल कॉलेज, सिव्हिल रुग्णालय, सिद्धेश्वर मंदिर, पासपोर्ट ऑफिस, दत्त चौक, अशा मध्यवर्ती रस्त्यावर भिक्षेकरांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पोटाची खळगी भरण्याची भ्रांत असणाऱ्या या वंचितांना दिवाळीचे जणू काही देणं घेणंच नाही. अशा स्थितीत ते दिवस काढतात. कोण दिले तर खायचं नाही तर… उपाशीपोटी रहायच, असे दिवस कंठीत असताना काही दानशूर व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून वंचितांची दिवाळी साजरी केली जात आहे. काही सामाजिक संस्था या अशा भिक्षेकऱ्यांना अभ्यंगस्नान घालून त्यांना गोडाधोडाचे रुचकर खाद्य पदार्थ खाऊ घालून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.
शहरातील विविध चौका चौकात अशा भिक्षेकरूची बेघरांची गर्दी वाढलेली आहे. घर नसलेल्या अनेकांना महापालिकेच्या बेघर निवारा केंद्रात रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. मात्र अशा बेघरांनी केंद्रातून पळ काढला. वृद्ध असलेले बेघर या केंद्रात वास्तव्यास आहेत. त्यांच्यासोबतच दिवाळी सण साजरी केली जात आहे. त्यांना अभ्यंगस्नान घालून फराळ देऊन विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे मनोरंजन केले जात आहे. आपले घर सोडून आलेल्या बेघरांच्या कुटुंबीयांची संपर्क साधून त्यांना पुन्हा त्यांच्या घरी पाठवले जाते. सोलापूर शहर जिल्ह्यासह बीड, लातूर, धाराशिव मराठवाड्यातील अनेक बेघर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे योग्यरित्या समुपदेशन केल्यानंतर आपल्या कुटुंबाची माहिती देतात. अशावेळी त्यांना आपलेपणाची भावना देऊन त्यांच्या घरी पाठवण्यासाठी मन वळवण्याचे प्रयत्न केले जाते.
महापालिकेच्या बेघर निवारा केंद्रात दिवाळी साजरी
सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या शहरी भागातील बेघर निवारा केंद्रात यंदाची दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या बेघर निवारा केंद्रात सुमारे ४० बेघरांची देखरेख केली जाते. त्यांच्यासोबत दिवाळीचा सण उत्सव साजरा करण्यात आला. पौष्टिक अन्न दिवाळीचा फराळ देण्यात आला. सत्यजित वडावराव, समुदाय संघटक वसीम शेख धर्मा कांबळे, राघवेंद्र बोरगावकर, शशिकांत जाधव आदींच्या सहकार्याने केंद्रात विविध सण उत्सव जयंती साजरी करून विविध उपक्रम राबवले जातात.
– अशोक वाघमारे, व्यवस्थापक बेघर निवारा केंद्र कुमठा नाका सोलापूर
फोटो ओळ – बेघर निवारा केंद्रात बेघरांसोबत महापालिकेचे अधिकारी कर्मचारी दिवाळी सण साजरा करतानाचे दृष्य