सोलापूर – शहरात आयटी पार्क उभारण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचलण्यात आलं असून, दिवाळीच्या निमित्ताने सोलापूर आयटी असोसिएशनच्या वतीने आयोजित “टेक ब्रू कॉन्फरन्स” या मेळाव्यात सुमारे २०० हून अधिक आयटी प्रोफेशनल्स एकत्र आले. पुणे, हैद्राबाद, बेंगळुरू, मुंबई, गुरुग्राम, अहमदाबाद अशा विविध शहरांत कार्यरत असलेले सोलापुरचे युवक-युवती मोठ्या उत्साहाने या मेळाव्यात सहभागी झाले.
या मेळाव्याचे उद्दिष्ट सोलापुरातील टॅलेंट परत आणून, येथेच कंपन्या सुरु करण्यासाठी वातावरण तयार करणे हे होते. सोलापूर डिजिटल प्रगतीसाठी सक्षम शहर बनवण्याच्या दिशेने हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे सहभागींचे मत होते.
आयटी पार्कसाठी आवश्यक जमीन उपलब्ध असून, स्थानिक स्तरावर इन्फ्रास्ट्रक्चर, मनुष्यबळ, तसेच सरकारी सहकार्य मिळाल्यास सोलापूर पुढील काही वर्षांत महाराष्ट्रातील महत्वाचे आयटी केंद्र बनेल, असा ठाम विश्वास आयटी व्यावसायिकांनी व्यक्त केला.
या परिषदेत विविध शहरांत कार्यरत असलेल्या सीईओ आणि डायरेक्टर्सना सोलापूरात शाखा सुरु करण्यासाठी औपचारिक पत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला. “जिथे काम करतात तिथल्या कंपनींची शाखा सोलापुरात सुरु करावी” अशी सामूहिक मागणी सहभागी प्रोफेशनल्सनी केली.
सोलापूर आय.टी. असोसिएशनचे संस्थापक सचिव विजय कुंदन जाधव म्हणाले,“सोलापूरचं टॅलेंट जगभर पसरलेलं आहे. आपलेच अभियंते पुणे, हैद्राबाद, बेंगळुरू, सिंगापूर, दुबई इथं उत्कृष्ट काम करत आहेत. आता हेच टॅलेंट आपल्या शहराच्या विकासासाठी वापरण्याची वेळ आली आहे. आयटी पार्कच्या माध्यमातून सोलापुरात हजारो रोजगार निर्मिती होईल आणि स्थानिक युवकांना नवी संधी मिळेल.”
सोलापूरचा हा मेळावा म्हणजे केवळ एकत्र येणे नव्हे तर “सोलापूरसाठी काम करण्याची सामूहिक शपथ” होती. आगामी काळात सोलापुरात अनेक कंपन्या शाखा सुरु करतील, रोजगार वाढेल, आणि शहराचे नाव आयटी नकाशावर झळकेल, असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी जामश्री रियालिटीचे अध्यक्ष राजेश दमाणी, अंकीत दमाणी, सोलापूर आय.टी. असोसिएशनचे अध्यक्ष अपुर्व जाधव, उपाध्यक्ष माऊली झांबरे, सचिव विजय कुंदन जाधव, सहसचिव अभिषेक जोशी, खजिनदार जयंत होले पाटील, सहखजिनदार रोहन फुरडे, संचालक नवनाथ तोरणे, अभिजित राठोड, दर्शन जाधव, विराज कुलकर्णी आणि धीरज करळे आदी मान्यवर उपस्थित होते.