सोलापूर – सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला होता. सोलापूर शहरातल्या तिन्ही मतदारसंघात देखील या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. पूरग्रस्त शेतकऱ्यांना व शहरातल्या श्रमिकांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे अल्पावधीतच खात्यावर सरकारी मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
11 सप्टेंबर रोजी सोलापूर शहरात झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. कष्टकरी श्रमिकांचे या पावसात मोठे नुकसान झाले. अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक उध्वस्त झाले. अनेकांच्या शेतातली माती वाहून गेली, अनेकांची जनावरे सुद्धा मृत पावली. हवालदिल झालेल्या अशा शेतकऱ्यांना व शहरातल्या श्रमिकांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने पंचनामे करायला लावले. विरोधकांनी मात्र वर्षभरात एकही रुपया मिळणार नाही अशी टीका करत खिल्ली उडविली होती. मात्र, जयकुमार गोरे यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केल्याने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारी मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय जिल्हा नियोजन समिती मधून शेतकऱ्यांना मदतीचे कीट देण्याचे नियोजन जयकुमार गोरे यांनी केले होते. जीवनावश्यक वस्तू, धान्य आणि कपडे आदींचा समावेश असलेले हे कीट दिवाळीपूर्वीच पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यात आले.
================
चौकट
शहरात पहिल्यांदाच झाले पंचनामे आणि मदतही पोहचली
११ सप्टेंबर रोजी झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील अनेक भागातील नागरिकांच्या घरात व आस्थापनांमध्ये पाणी शिरुन नुकसान झाले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः या भागाची पाहणी केली होती. शहरात आजवर कधीच अशा नुकसानीचा पंचनामा करण्यात आला नव्हता. मात्र जयकुमार गोरे यांनी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्यास सूचना दिल्या. जिल्हा नियोजन समितीकडून दिले जाणारे जीवनावश्यक वस्तूंचे किट सुरुवातीला १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत केवळ ग्रामीण भागामध्ये देण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांना सूचना देऊन ग्रामीण भागाप्रमाणे शहरातल्या बाधित कुटुंबांना सुद्धा जीवनावश्यक वस्तूंचे कीट दिवाळीपूर्वी मिळावेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली आणि प्रशासनाला सूचना देऊन हे कीट पोहोचवण्यात आले.
=================
चौकट
मदतीच्या कीट वर गोरेंनी टाळला स्वतःचा फोटो
जिल्हा नियोजन समितीकडून ग्रामीण भागातल्या अतिवृष्टी व पुराने बाधित शेतकऱ्यांना तसेच शहरी भागात बाधित झालेल्या कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या किटवर पालकमंत्र्यांचा फोटो घ्यावा अशी सूचना काही अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी केली होती. मात्र स्वतः जयकुमार गोरे यांनी सक्त ताकीद देऊन आपण फक्त काम करत राहायचे. संकटात सापडलेल्या लोकांसोबत राहायचे. त्यावर फोटो छापून प्रसिद्धी देण्याचे काहीही कारण नाही असे सांगितले. कुठल्याही जाहिरातबाजी शिवाय अशी मदत पोहोचवणाऱ्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.