नवी दिल्ली – राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवाशांना प्रवासाचा उत्तम अनुभव घेता यावा यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 23 राज्यांमध्ये नेटवर्क सर्वेक्षण वाहने तैनात करणार आहे. ही वाहने राष्ट्रीय महामार्गांवरील विविध भागातल्या रस्त्यांची सूची आणि पदपथांच्या स्थितीची आकडेवारी गोळा करणे, प्रक्रिया तसेच विश्लेषणासाठी 20,933 किलोमीटर अंतर पार करतील. या वाहनांच्या तैनातीमुळे महामार्ग प्राधिकरणाला रस्ते सूची आणि पदपथांच्या स्थितीशी निगडीत आवश्यक आकडेवारी गोळा करण्यास मदत मिळेल, यामध्ये पृष्ठभागावर भेगा, खड्डे आणि भिन्न थर इत्यादी रस्त्यांशी संबंधित सर्व दोषांचा समावेश असेल. नेटवर्क सर्वेक्षण वाहनांच्या सर्वेक्षणाद्वारे गोळा करण्यात येणारी माहिती रस्त्यांच्या परिस्थितीतील त्रुटी अधोरेखित करेल, त्यामुळे महामार्गांच्या उत्तम देखभालीसाठी सुधारणात्मक उपाययोजना तत्परतेने करण्यास महामार्ग प्राधिकरण प्रेरित होईल.
नेटवर्क सर्वेक्षण वाहनांच्या सर्वेक्षणाद्वारे गोळा करण्यात आलेली माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या ‘एआय’आधारित पोर्टल डेटा लेकवर टाकण्यात येईल, जिथे त्याचे महामार्ग प्राधिकरणातील तज्ज्ञाच्या समर्पित पथकाद्वारे माहितीचे विश्लेषण करण्यात येईल, जेणेकरून त्याचे माहितीत आणि कृतीयोग्य उपाययोजनांमध्ये रूपांतर होईल. शेवटी, भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, नियमित अंतराने गोळा केलेली माहिती, भविष्यात रस्ता मालमत्ता व्यवस्थापन प्रणालीमध्ये विहित स्वरूपात जतन केली जाईल.
थ्री डी लेसर आधारित प्रणाली वापरून पदपथ स्थिती सर्वेक्षण करण्यात येईल, ज्यामध्ये उच्च रिझ्योल्यूशनचे 360 अंश कोनातील कॅमेरे, डीजीपीएस (डिफरेंशियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम), आयएमयू (इनर्शियल मेजरमेंट युनिट) आणि डीएमआय (डिस्टन्स मेजरिंग इंडिकेटर) यांच्या मदतीने कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वयंचलित पद्धतीने रस्त्यातील दोष सापडण्यास आणि त्याचा अहवाल तयार करण्यासाठी सक्षम आहेत. यादी करणे आणि पदपथांच्या स्थितीची माहिती अचूकपणे मोजण्यासाठी आणि अहवाल तयार करण्यासाठी बहुआयामी माहिती अधिग्रहण आणि प्रक्रिया सॉफ्टवेअरने सुसज्ज आहेत.
नेटवर्क सर्वेक्षण वाहने तैनात असलेल्या 2/4/6 आणि 8 मार्गिकेच्या सर्व प्रकल्पांसाठी काम सुरू होण्यापूर्वी आणि त्यानंतर सहा महिन्यांच्या नियमित अंतराने माहिती गोळा केली जाईल. हा उपक्रम राबवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पात्र कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत.