नागपूर – उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेच्या प्रगतीच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकण्याच्या, आणि जीवरक्षक उपचार अधिकाधिक जनतेला उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून एम्स नागपूर आणि बाल आयुष फाउंडेशन, बंगळुरू यांनी अस्थिमज्जा प्रत्यारोपण म्हणजेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट (बीएमटी) सुविधा सक्षम करण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.

दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी डॉ. प्रशांत पी. जोशी, कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, एम्स नागपूर, तसेच डॉ. विंकी रुघवानी, अध्यक्ष, थॅलेसेमिया आणि सिकल सेल सोसायटी ऑफ इंडिया, आणि ललित परमार, प्रतिनिधी, बाल आयुष फाउंडेशन यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या करारांतर्गत एम्स नागपूरमध्ये दोन नवे अत्याधुनिक बीएमटी कक्ष उभारण्यात येणार आहेत. या विस्तारामुळे एम्स नागपूरमधील एकूण बीएमटी कक्षांची संख्या चार होणार असून, संस्थेची विशेषीकृत, दर्जेदार आणि सर्वसमावेशक प्रत्यारोपण सेवा देण्याची क्षमता वाढणार आहे. आजपर्यंत एम्स नागपूरमध्ये 12 बीएमटी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. मध्य भारतात हिमॅटोलॉजी आणि कर्करोग उपचार क्षेत्रात हे एक महत्त्वाचे यश ठरले आहे.
बाल आयुष फाउंडेशन ही पायाभूत सुविधा कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रमांतर्गत उभारणार असून, आरोग्य उत्कृष्टतेसाठी व प्रगत उपचार सर्वांना उपलब्ध व्हावेत, या ध्येयावर आधारित हे सहकार्य आहे.
हा सामंजस्य करार केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने शक्य झाला आहे. हे सहकार्य एम्स नागपूरच्या उच्च तंत्रज्ञानाधारित, स्नेहपूर्ण आणि समावेशक आरोग्यसेवा देण्याच्या ध्येयाच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

* * *