सोलापूर : महाराष्ट्र राज्यात प्रमुख पाच पक्ष हे वाटाघाटी करून सत्तेत राहतात. या षडयंत्राला कोणीही फसू नये. आपण लढणार आहोत. आपना टाईम आयेगा. वंचितांची एक युवा आघाडी उभी राहत आहे. नेपाळ, लडाखच्या धरतीवर युवकांनी भूमिका घेतली तर प्रस्थापितांना पळायला जागा राहणार नाही. आपला शत्रू ओळखला पाहिजे. सोलापुरातील बेरोजगारीला काँग्रेस, भाजपा जबाबदार आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापुरातील सभेत केला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर शहर शाखेच्या वतीने आयोजित ‘स्वाभिमानी एल्गार जनसभेत युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापूरची भीषण बेरोजगारी आणि पूरग्रस्तांना अपुरी मदत यावरून काँग्रेस आणि भाजपवर सडकून टीका केली. यावेळी विचारमंचावर
केंद्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. नितीन ढेपे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ साळुंखे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मोडीखांबे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, अनिरुद्ध वाघमारे, सचिव विनोद इंगळे, पल्लवी सुरवसे, महेश जाधव, राजन शिंदे विक्रांत गायकवाड ,अतिश बनसोडे, विजयानंद उघडे, अमोल लांडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या तडाकेबाज भाषणात सुजात आंबेडकर यांनी सोलापूरच्या ज्वलंत प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. आंबेडकर म्हणाले, सोलापूरची चादर एकेकाळी जगभरात प्रसिद्ध होती, पण आज चादरीचे उत्पादन ठप्प झाले आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्री बंद पडल्यामुळे अनेक लोकांचा रोजगार गेला आहे.” येथील व्यवस्था वर्षाला १० हजार नोकऱ्याही देऊ शकत नाही, त्यामुळे तरुण महाराष्ट्राबाहेर जाण्यास मजबूर होत आहेत. सत्ताधाऱ्यांनी सरकारी कॉलेजेस, इन्स्टिट्यूशन्स आणि शाळा बंद पाडून स्वतःचे खासगी इन्स्टिट्यूशन्स सुरू केले आणि लूट करून स्वतःचे खिसे भरले. त्यांच्या हातून सत्तेची तिजोरी आणि खुर्ची काढल्यास ही लोकं बरोबर लाईनीवरती येतील,” असे ते म्हणाले.
सोलापूरमध्ये आलेल्या पूर परिस्थितीत एकही आमदार-खासदार मदतीसाठी धावून गेला नाही. ज्यांचे घर दोन दिवसांपेक्षा जास्त पाण्याखाली होते, त्यांना सरकारने केवळ ५ हजार रुपयेची मदत दिली. शेतकऱ्यांना हेक्टरी केवळ ८,५०० रुपयांची मदत दिली. “शेतकरी राजा भिकारी नाही, तुमच्या दरबारात उभा राहण्यासाठी,” अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांसाठी अपुऱ्या मदतीबद्दल संताप व्यक्त केला.यांनी भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही “सापनाथ-नागनाथ” संबोधले. काँग्रेस व भाजपा व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करतात. महाबोधी बुद्ध विहारासंदर्भातला कायदा काँग्रेसच्या काळात झाला तर त्या कायद्याची पाठराखण भाजपा करत आहे, असा आरोप यावेळी सुजात आंबेडकर यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपला शत्रू ओळखा. वंचित आघाडीच्या उमेदवारांना खंबीर पाठबळ द्या, असेही ते म्हणाले. दरम्यान, यावेळी पदाधिकाऱ्यांचीही भाषणे झाली. त्यांना वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे आजही खुले !
सोलापूर लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आमचा प्रचार केला होता मात्र विविध कारणाने ते पक्ष सोडून गेले. त्यांना आमच्या पक्षाचे दरवाजे नेहमी उघडे राहतील. जर विरोधात गेला तर मैत्रीभाव तिकडे मिळणार नाही, असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना केले.


















