बार्शी – कृषी विभाग बार्शी सप्टेंबर २०२५ मध्ये बार्शी तालुक्यातील शेती पिकाचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने मागितलेल्या अहवालामध्ये ग्रामस्तरीय समितीमधील सहाय्यक कृषी अधिकारी यांनी पीकनिहाय नुकसानीची टक्केवारीचा अहवाल तालुका कृषी अधिकारी यांच्यावतीने प्रशासनाला सादर करण्यात आला होता.
तालुकास्तरीय समितीने तो अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर यांना सादर केल्यानंतर जिल्हा अधीक्षक कार्यालयाच्यावतीने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करुन तसेच द्राक्षाच्या व फळ पिकाच्या बाबतीमध्ये फलोत्पादन तज्ञांची समिती बोलावून पाहणी करुन त्यांच्या अहवालानुसार द्राक्ष व इतर फळ पिकांचा पंचनाम्यामध्ये समावेश करण्यात आला होता. यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे, राज्याचे फलोत्पादन संचालक विभागीय कृषी सहसंचालक पुणे दत्तात्रय गावसाने यांच्या मार्गदर्शनात सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले व उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डवाडी संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी फळ व इतर पिकाचा सविस्तर नुकसानीचा नजर अंदाज अहवाल राज्य शासनास सादर केलेला आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले यांनीही विविध भागात पाहणी करुन माहिती घेतली. मंत्रालय स्तरावर भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्ता भरणे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री भरत गोगावले व विविध विभागाचे सचिव, अधिकारी यांच्या भेटी घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणेस बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत प्रयत्नशील होते. त्यांच्यामुळे नुकसानग्रस्त सर्व पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्यावतीने तालुका प्रशासनाला सविस्तर पंचनामे करण्याचे व अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. मग त्यानुसार प्रत्येक खातेदार निहाय सहाय्यक कृषी अधिकारी यांनी दर्शवलेल्या पीकनिहाय नुकसानीची टक्केवारी नमूद असलेली नुकसान ग्रस्त खातेदार यादी तालुका प्रशासनाला देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. शेतकऱ्याचे पीकनिहाय झालेले नुकसान पिक पाहणी करुन पंचनाम्यावर दर्शवण्याची महत्त्वाची जबाबदारी कृषी विभागाने पार पाडली आहे. मग तालुका प्रशासनामार्फत तयार झालेल्या याद्या ऑनलाइन अपलोड करण्याची कार्यवाही तहसील कार्यालयाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात येत आहे. या सर्व घडामोडीमध्ये कृषी विभागातील गाव पातळीवरील कृषी अधिकारी ते कृषी आयुक्त यांच्यापर्यंत सर्वांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.


















