बार्शी – दिवाळी पाडव्याच्या शुभप्रसंगी जय शिवराय प्रतिष्ठान, बार्शी यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती परिसर — शिवसृष्टी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवदीप महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला स्मार्ट अकॅडमीचे अध्यक्ष सचिन वायकुळे, ॲड. राजश्री डंमरे (तलवाड), शोभा घुटे, शैलजा गीते, किरण कोकाटे, महेश देशमुख, वसंत हवलदार, तुळशीदास मस्के आणि अजित बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करुन आणि दीप प्रज्वलित करुन करण्यात आली. जय शिवराय प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन शेकडो दिवे तयार केले होते. या दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण शिवसृष्टी परिसर उजळून निघाला आणि तेथील वातावरण शिवमय झाले.
प्रमुख पाहुणे सचिन वायकुळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या संघटना समाजात सकारात्मक बदल घडवतात. स्वार्थ बाजूला ठेवून समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या या संस्था खऱ्या अर्थाने शिवचरित्राची पेरणी करतात.’

याप्रसंगी अनेक शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने दिव्यांच्या तेजाने न्हाऊन निघालेल्या शिवसृष्टीत भक्तिमय व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन जय शिवराय प्रतिष्ठानच्या सदस्यांच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांकडून संस्थेचे अभिनंदन करण्यात आले.


















