सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना ‘डॅमेज कंट्रोल’साठी पाठवूनही त्यांच्या बैठकीकडे पाटील आणि माने यांनी पाठ फिरवली, त्यामुळे पाटील-मानेंचा निर्णय पक्का दिसून येत आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी भाष्य केले. ‘आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही त्यांना भरपूर दिलं आहे,’ असं सूचक विधानही त्यांनी केले आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे आज मोहोळच्या दौऱ्यावर आले होते. सेवानिवृत्त आदर्श शिक्षकांच्या सन्मानासाठी आज मोहोळमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना आमदार बनसोडे यांनी राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाष्य केले.
ते म्हणाले, उमेश पाटील यांनी काम केलंय. ह्यापूर्वी त्यांच्याकडे सत्ता होतीच, त्यामुळे असं बोलणं उचित असणार नाही. प्रत्येक पक्षामध्ये शिस्त आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली मागच्या वीस वर्षांपासून मी पक्षात काम करत आहे. आमच्या पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातही अशा पद्धतीने पडझड होत राहते, शेवटी सर्व कार्यकर्त्यांसाठी पक्ष हा मोठा असतो. पक्ष हा महत्वाचा असतो.
आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांनाही भरपूर दिलेले आहे, त्यामुळे तुम्हाला भरपूर दिलेला असताना पक्ष अडचणीत असताना, पक्षाच्या खराब परिस्थितीमध्ये आपण पक्ष सोडणं हे उचित नाही, असा सल्लाही अण्णा बनसोडे यांनी राजन पाटील आणि यशवंत मानेंना दिला.उमेश पाटील म्हणाले, मागच्या आठवड्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही माजी आमदारांनी भाजप प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश असणार आहे. जसा भाजपमध्ये माजी आमदारांनी प्रवेश केला आहे, तशाच पद्धतीने मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही इनकमिंग सुरू आहे. अजितदादा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत त्यांच्यापेक्षा जास्त पटीने इनकमिंग चालू आहे.
पक्ष न बघता सच्चा कार्यकर्त्यांशी पाठीशी उभं राहणार
आमदार राजू खरे जवळिकतेबाबत अण्णा बनसोडे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे हे माझ्या बाजूला बसलेले आहेत, तुम्ही जर हे त्यांना विचारलं तर बरं होईल. मी स्वतःही मोहोळचाच आहे; कारण माझा जन्म मोहोळमध्ये झालेला आहे. मी, उमेश पाटील, राजू खरे आम्ही तिघेही सच्चा कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहणार आहोत. त्यावेळी आम्ही पक्ष किंवा काही असा भेदभाव करणार नाही.




















