पंढरपूर – संपत आलेल्या शाळांच्या दिवाळीच्या सुट्या त्यामध्येच लागून आलेला शासकीय सुट्या आणि येत्या आठ ते दहा दिवसांवर आलेली कार्तिकी यात्रा या पार्श्वभूमीवर पंढरपूरात विठुरायाच्या दर्शनासाठी सध्या भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे भाविकांच्या गर्दी बरोबरच त्यांनी आणलेल्या चारचाकी गाड्यांची देखील मोठी भर पडलेली दिसत आहे. भाविकांच्या चारचाकी गाड्यांमुळे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतूकीची कोंडी निर्माण होवू लागलेली आहे.वाहतूक पोलिस तर या गर्दीचे नियंत्रण करीत आहेत पण शनिवारी माजी आमदार प्रशांत परिचारकांना देखील रस्त्यावर उतरून वाहतूकीची कोंडी सोडवावी लागली.
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलरुक्मिणीच्या दर्शनासाठी कायमच पंढरपूरात गर्दी असते. नुकताच दिवाळी सण झालेला आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने आता शाळांच्या सुट्या संपत आलेल्या आहेत. त्यामध्ये शासकीय सुट्या तसेच त्याला लागून आलेले शनिवार, रविवार हे सुटीचे दिवस तसेच येत्या आठ ते दहा दिवसांवर आलेली कार्तिकी यात्रा या सर्व पार्श्वभूमीवर पंढरपूरात गेल्या दोन,तीन दिवसांपासून भाविकांची संख्या कमालीची वाढत आहे. शहरातील सर्व धर्मशाळा, लाँजेस तसेच भक्त निवास सध्या हाऊसफुल्ल झालेले आहेत. विठुरायाच्या दर्शनाची रांग देखील येथील गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेड पर्यंत गेलेली आहे. भाविकांना विठ्ठलरुक्मिणीच्य पदस्पर्श दर्शनासाठी सहा ते सात तासांचा कालावधी लागत आहे.
या गर्दीमुळे शहरातील नागरिकांचे मात्र कमालीचे हाल होवू लागलेले आहेत.शहरातील सर्वच रस्त्यावर वाहतूकीच्या कोंडीची समस्या निर्माण होत आहे. कारण मोठ्या संख्येने येथे आलेल्या भाविकांनी आपल्या सोबत चारचाकी गाड्या देखील आणलेल्या आहेत. शहरात पार्किंगच्या सुविधा तोकड्या आहेत. एकीकडे भाविकांच्या होत असलेल्या गर्दीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरुनल चालणे देखील मुश्किल होत असताना त्यामध्ये वाहनांची गर्दीची मोठी भरत पडत आहे. त्यामुळे शहरातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवर वारंवार वाहतूकीची कोंडी निर्माण होत आहेत.
येथील शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेचे कर्मचारी आपल्यापरीने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक नियंत्रणात व्यस्त दिसत आहेत. मात्र त्यांची संख्या खूपच अपुरी पडत आहे. त्यामुळे एका रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी सोडवे पर्यंत दुसऱ्या रस्त्यावर वाहतूकीची कोंडी निर्माण होत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका आज माजी आमदार प्रशांत परिचारक यांना देखील बसला. येथील स्टेशन रस्त्यावर शनिवारी (ता.२५) वाहतूकीची कोंडी निर्माण झालेली होती. त्यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक हे स्व:त गाडीतून रस्त्यावरील कोंडी सोडविण्यासाठी खाली उतरले. यावेळी स्वत: परिचारक तसेच त्यांच्या सोबत असलेले माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट पापरकर, माजी नगरसेवक विक्रम शिरसट पापरकर तसेच त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांनी निर्माण झालेली वाहनांची कोंडी सोडवून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला.
—————–
अतिक्रमणे आणि बेशिस्तपणे लावली जाणारी वाहने
शहरातील स्टेशनरस्ता, नगरप्रदक्षिणा रस्ता, विठ्ठल मंदिर परिसर, भक्तीमार्ग, रेल्वेस्टेशनकडे जाणारा रस्ता, गजानन महाराज मठ समोरील रस्ता, भक्तीमार्ग,संतपेठ महात्मा फुले पुतळा चौक, भादुले चौक, अर्बंन बँक मुख्य शाखेसमोरील रस्ता, नाथचौकाकडे जाणारा रस्ता, भोसले चौक, कैकाडी महाराज मठकडे जाणारा रस्ता, नवीन (अहिल्या ) पूलाकडे जाणारा रस्ता, लिंकरोड, तहसील समोरील रस्ता आदी रस्त्यांवर अतिक्रमणे वाढलेली दिसत आहेत. फेरीवाले, गाडेवाले आपली वाहने चक्क रस्त्यांवर लावून व्यवसाय करताना दिसतात. वरील अनेक रस्त्यांवर अतिक्रमणे वाढलेली दिसत आहेत. त्यामुळे रस्ते चालण्यासाठी आरुंद पडत आहेत. यामध्ये भाविकांची गर्दी वाढली, त्यांच्या बरोबर चारचाकी वाहनांची गर्दी वाढली की शहरातील वाहतूकीचे नियोजन कोलमडून पडते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कायमस्वरुपी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे, फेरीवाले, गाडेवाले यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.




















