सापासोबत केलेला खेळ जीवघेणा ठरू शकतो. विषारी सापानं दंश केल्यास काही तासांत मृत्यू होऊ शकतो. मात्र त्यानंतरही काही जण सापाशी खेळ करतात. साप पकडून त्याच्यासोबत स्टंट करतात. आंध्र प्रदेशातही असाच प्रकार घडला. मोबाईलमध्ये सेल्फी काढण्यासाठी एकानं साप गळ्याभोवती गुंडाळला. थोड्या वेळात त्यानं सापाला दूर करण्याचा प्रयत्न केला. तितक्यात सापानं दंश केला.
सापासोबत सेल्फी काढणं आंध्र प्रदेशातील तरुणाला महागात पडलं. पोत्तिसिरामुलू नेल्लोर जिल्ह्यातील कंडुकुरमध्ये हा प्रकार घडला. कंडुकुर येथे ज्युसचं दुकान चालवणाऱ्या मणिकांत रेड्डी यांना सापासोबत सेल्फी काढायचा होता. त्यासाठी मणिकांत रेड्डी आरटीसी डेपोजवळ गेले. तिथे एक गारुडी होता. त्याच्याकडे असलेला साप मणिकांत यांनी गळ्याभोवती गुंडाळला. त्यानंतर मणिकांत सेल्फी काढू लागले.
सेल्फी काढून झाल्यावर मणिकांत त्याला मानेजवळून दूर करू लागले. तितक्यात सापानं मणिकांत यांना दंश केला. स्थानिकांनी मणिकांत यांना घेऊन ओंगोलेच्या रिम्स रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच मणिकांत यांनी अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.