मोहोळ : सामाजीक काम करित असताना जनतेची कामे होणे गरजेचे आहे त्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगर परिषद आपल्या ताब्यात असणे गरजेचे आहे त्या साठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया . एवढे दिग्गज आपल्या सोबत असताना काहीही अशक्य नाही असे प्रतिपादन जि.प .चे माजी अध्यक्ष आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी मोहोळ येथे केले .मोहोळ येथे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राजन पाटील विरोधातील सर्वपक्षीय सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून काकासाहेब बोलत होते .यावेळी बोलताना शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक गायकवाड यांनी आपल्या भाषणात मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती ज्या उद्देशाने स्थापन करण्यात आली होती तो उद्देश पूर्ण झाल्याने ही समिती समाप्त करीत आहे. व्यासपीठावर बसलेल्या प्रमुख नेत्यांनी मनात आणले तर जिल्हा परिषदेवर ही मोहोळ तालुक्याचा दबदबा निर्माण करू. आम्ही कमजोर नाही, आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे.उमेश पाटलांनी जर त्यांचा स्वभाव बदलला असता तर ते आज या व्यासपीठावर दिसले असते. मला जर व्यासपीठावरील नेत्यांनी आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी साथ दिली तर ६ जिल्हा परिषदांपैकी ५ व मोहोळ नगर परिषदेत २१-० ने बाजी मारू. आमदारांनी सावली बंगला सोडून शासकीय विश्रामगृहावर बसून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात तरच या मतदारसंघाला न्याय मिळेल असेही दिपक गायकवाड यांनी म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे, अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती विजयराज डोंगरे, जकराया परिवाराचे सचिन जाधव, माजी उपसभापती मानाजी माने, बाळासाहेब गायकवाड, संजय क्षीरसागर, सीमा पाटील,सतीश जगताप, अशोक भोसले,अरुण पाटील, सुभाष पाटील,नागेश साठे, सर्जेराव चवरे, सुनील पाटील,सुलेमान तांबोळी, राजेश पवार, श्रीकांत गायकवाड, सत्यवान देशमुख, महेश देशमुख,विक्रम देशमुख,शिवरत्न गायकवाड, दीपक गवळी,पृथ्वीराज डोंगरे, भीमराव वसेकर, दिलीप गायकवाड, राजकुमार पाटील,नवनाथ वसेकर,किशोर पवार आदींसह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बळीराम साठे म्हणाले, या तालुक्यामध्ये गेले अनेक वर्षे विशिष्ट व्यक्तीची सत्ता होती. त्या सत्तेमधून तुम्हाला अनेक बाबी सहन कराव्या लागल्या, त्याला कुठेतरी तोंड फोडण्याच्या निमित्ताने आपण आज या समविचारी बैठकीला उपस्थित राहिलो. आपल्यातील इर्षा जागृत झाल्यानेच आमदारकीच्या निवडणुकीत परिवर्तन झाले असे सांगत येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढून त्यात विजय मिळवणार असल्याचेही बळीराम काका साठे म्हणाले.यावेळी विजयराज डोंगरे म्हणाले, घर एकत्र ठेवायचे असेल तर सर्वांनीच दोन चार पावले मागे सरकले पाहिजे. पुढचे भविष्य कोण बघितले. आपण सर्वजण एकत्र येऊन विधानसभा लढवली व विजय मिळवला. आपल्या सर्वांचा विरोधक आणि उद्देश एकच आहे. असे असताना सर्व नेत्यांनी एकमेकांची मान मर्यादा जपली पाहिजे. एक हुकूमशाह नको म्हणून दुसरा तयार होत असेल तर तसे योग्य नाही.
यावेळी संजय क्षीरसागर म्हणाले, कुणाच्या भूलथापांना बळी न पडता ज्यांनी संघर्ष केला, चटके सोसले त्यांना पुढे आणा. राजकारणाचा तालुक्यातील दर्जा घसरत चालला आहे. कोणीही उठते कोणावरही काहीही टीका करताय. विरोधकांवर टीका जरी करायची असेल तर संस्कार ढळू देऊ नका, अरेरावीची भाषा वापरू नका, आपले राजकीय भांडण आहे, त्यातून टीका करा असे सांगत एकत्र राहिलो तर निश्चित समविचारी आघाडीला यश मिळणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी मोहोळ शहर व तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहोळ बचाव संघर्ष समिती करण्यात आल्याची घोषणा केल्यामुळे मलिदा गँगचे काय होणार ?याची चर्चा रंगली आहे . या मुख्य बैठकीला आमदार राजू खरे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील अनुपस्थित होते यामुळे एकीत फूट पडते की काय ?अशी चर्चा सुरू झाली आहे .




















