सोलापूर- लाल महाल उत्सव समिती पुणे यांच्याकडून शिवतेज दिनाचे औचित्य साधून मिलिंद एकबोटे यांच्याकडून शिवतेज पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. हा पुरस्कार मराठा समाजाचे जेष्ठ नेते दास शेळके यांना जाहीर करण्यात आला होता, परंतु प्रकृती ठीक नसल्यामुळे पुणे येथे पुरस्कार स्विकारू शकले नाही त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोटातुन निर्दोष झालेले समीर कुलकर्णी यांनी दास शेळके यांच्या घरी येऊन शिवतेज पुरस्काराने सन्मानित केले.
आजवरच्या शिवकार्याची दखल घेऊन तसेच शहाजीराजे यांच्या समाधीची देखभाल केल्याबद्दल व शहाजी महाराज यांचे थोरले चिरंजीव, छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांना अफजलखानाने कपटकारस्थान करून मारले त्यांची समाधी कनकगिरी जिल्हा कोपल येथे असून त्या समाधीचे काही समाजकंटकांनी थडग्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणच्या वस्तुस्थितीची दास शेळके यांनी तिथे जाऊन पाहणी केली व झालेला प्रकार लोकांच्या समोर आणला या कार्याची दखल घेत शिव कार्याची कृतज्ञता प्रदान करण्यासाठी हा शिवतेज पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल मिलिंद एकबोटे व लाल महाल उत्सव समिती, पुणे यांचे दास शेळके यांनी आभार मानले.




















