सोलापूर – सुख समृद्धीची दिवाळी संपल्यानंतर शहरात प्लास्टिक कचऱ्याच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. शहरात विविध मोकळ्या जागेत स्टॉल्सच्या माध्यमातून फटक्यांची विक्री करण्यात आली. दिवाळीत अनेकांनी फटक्यांची मोठी खरेदी केली. परंतु दिवाळी संपल्यानंतर त्याच स्टॉल्सखाली प्लास्टिक आणि बॉक्सच्या कचऱ्याचा ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे.
एकीकडे लक्ष्मीपूजन आणि दीपावली पाडव्याच्या निमित्त बाजारात विविध प्रासादिक साहित्यांची खरेदी करण्यासाठी देखील कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून आले होते. आता त्यानंतर शहरातील अनेक मध्यवर्ती भागात फटाके स्टॉल थाटण्यात आले होते. फटाक्यांची विक्री केल्यानंतर उरलेले कचरा त्याच स्टॉल खाली टाकण्यात आला आहे. त्यामध्ये प्लास्टिक तसेच रिकामे खोके बॉक्स पडल्याने सर्वत्र स्वच्छता पसरलेली दिसत आहे. वास्तविक पाहता फटाके विक्री करून टाकण्यात आलेले रिकामे बॉक्स तसेच प्लास्टिक स्वतः संबंधित दुकानदाराने गोळा करण्याचे कर्तव्य असताना देखील तसे होताना दिसत नाही. याकडे महापालिका प्रशासन देखील दुर्लक्ष करत आहे.
नागरिकांमधून उमटतोय हा सूर
सध्या शहरातील पार्क चौक, सावरकर मैदान, होटगी रोड, गांधीनगर, विजापूर रोड, पुंजाल मैदान, येथे मोकळ्या जागेत स्टॉल थाटले गेले होते. सध्या स्टॉल्स काढण्याचे कामकाज सुरू आहे. स्टॉल्स काढल्यानंतर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात प्लास्टिक तसेच फटाक्यांचे रिकामे खोके मोठ्या प्रमाणात साचलेले दिसून येत आहेत. शहराचा कचरा संकलन करणाऱ्या व्यवस्थेवर याचा परिणाम होत असून, शहरातील यापूर्वीच बाजारपेठेत झालेला कचरा संकलन करतेवेळी शहरातील कचरा संकलनावर परिणाम झाला. दोन दिवस घंटागाडी नागरिकांच्या घरोघरी आले नसल्याने, येथे देखील नागरिकांची ओरड ऐकण्यास मिळाली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने यावर तोडगा काढावा, असा सूर आता स्थानिक नागरिकांमधून उमटत आहे.
स्वच्छतेचे नियम ठेवून स्टॉल थाटण्याची परवानगी द्यावी
दरवर्षी दिवाळी सणानिमित्त शहरात विविध ठिकाणी फटाके विक्रीसाठी स्टॉल्स थाटले जातात. दिवाळीमध्ये फटाक्यांची विक्री करून रिकामी झालेले खोके तसेच प्लास्टिक टाकून दिले जाते. यापुढे तसं न होता, संबंधित दुकानदाराच्या कचरा दुकानदारांनी संकलित करावा. अशी अट घालूनच महापालिका प्रशासनाने यापुढे स्टॉल थाटण्यासाठी परवानगी द्यावी.
– संतोष काळे, नागरिक




















