सोलापूर : प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या ७, ८ आणि ९ नोव्हेंबर २०२५ रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे ‘प्रिसिजन गप्पा’ आयोजन करण्यात आले आहेत. सोलापूरकर रसिकांना दिवाळीनंतर सांस्कृतिक गप्पांची दिवाळी अनुभवता येणार आहे, अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी दिली. यावेळी प्रिसिजन उद्योगसमूहाचे चेअरमन यतिन शहा हे उपस्थित होते.
प्रिसिजन गप्पांचं हे १७ वे वर्ष आहे. प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे तीनही दिवस सायंकाळी ६.२५ वाजता गप्पांना प्रारंभ होईल. नेहमीप्रमाणेच शिवछत्रपती रंगभवनमध्ये या गप्पा आयोजित केल्या आहेत. यावर्षी प्रिसिजन गप्पांना शुक्रवार, दि.७ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरवात होईल. पहिल्या दिवशी संकर्षण व्हाया स्पृहा’ हा एक मराठी कविता आणि कथाकथन कार्यक्रम आहे. ज्यात अभिनेते संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी सहभागी आहेत. या कार्यक्रमात कविता, किस्से आणि संकर्षण व स्पृहा यांच्यातील संवाद सादर केला जाणार आहे.
शनिवार दि.८ नोव्हेंबर रोजी गप्पांच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध कवि वैभव जोशी यांचा अपूर्वाई हा कार्यक्रम सादर होईल. अपूर्वाई हा एक वेगळा कार्यक्रम आहे. कविता, बासरी आणि गाणं यांचा त्रिवेणी संगम यात पाहायला मिळेल.या कार्यक्रमाची संकल्पना कवि वैभव जोशी यांची असून वैभव जोशी यांच्या समवेत सुप्रसिद्ध बासरी वादक अमर ओक आणि गायिका शरयू दाते यांची ही मैफल संगीत आणि कवितेचा जादुई संगम घडवते.
रविवार, दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजीचा दिवस सामाजिक पुरस्कारांचा असेल. यावर्षी अत्यंत वेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या दोन सामाजिक संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षीच्या दोन्ही संस्था या देशाच्या सीमावर्ती भागात कार्य करतात. सोल्जर्स इंडिपेन्डट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने सियाचेन या जगातल्या सर्वोच्च रणभूमीवर ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट सुरू करून तिथे सीमेवर दक्ष राहणाऱ्या सैनिकांच्या तसेच पर्यटक नागरिकांना या ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून अक्षरशः श्वास दिला. याबरोबरच सैनिकांच्या विधवा पत्नी व मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पुनर्वर्सन करण्याचं कार्य ही संस्था करते. श्रीमती सुमेधा चिथडे यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ३ लाख रूपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन ही अधिक कदम यांची संस्थादेखील काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात, अराजकतेमध्ये, युद्धामध्ये किंवा अन्य अशा कारवायांमध्ये अनाथ झालेल्या मुलां-मुलींच्या पुनर्वसनाचं कार्य करते. त्यांच्यासाठी आश्रम सुरू करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाते. त्यांच्या कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती केली जाते. मुख्य म्हणजे कुपवाडा, अनंतनाग, जम्मू अशा नेहमी अशांत असणाऱ्या भागात अधिक कदम यांचासारखा मराठी माणूस गेली ३० वर्षे कार्य करत आहे, हे विशेष कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रिसिजनचा सुभाष रावजी शहा स्मृति पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. २ लाख रूपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रख्यात वक्ते डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. पुरस्कार सोहळ्यानंतर श्रीमती सुमेधा चिथडे आणि अधिक कदम यांची मुलाखत उदय निरगुडकर हे घेणार आहेत.
रंगभवनच्या प्रांगणातही आसनव्यवस्था व एलईडी प्रोजेक्टरद्वारे कार्यक्रम पाहण्याची सोय असेल. तसेच रसिकांच्या पार्किंगची व्यवस्था वोरोनोको शाळेच्या मैदानावर करण्यात आली आहे. रसिक सोलापूरकरांनी ‘प्रिसिजन गप्पां’चा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ. सुहासिनी शहा व यतिन शहा यांनी केले. यावेळी माधव देशपांडे उपस्थित होते.




















