मुंबई – केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर २०२५ रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे खोल समुद्रातील दोन मासेमारी नौकांचे उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील समुद्री मत्स्य व्यवसायाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
खोल समुद्रातील मासेमारी नौका प्रकल्प प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) अंतर्गत राबविण्यात आला असून, यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) यांचे कर्ज स्वरूपात आर्थिक सहाय्य प्राप्त झाले आहे.
या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील मच्छीमार सहकारी संस्थांची खोल समुद्रातील मासेमारी क्षमता वाढविणे, भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (ईईझेड) ट्यूना व इतर सागरी संसाधनांना प्रोत्साहित करणे, तसेच मच्छीमारांचे उत्पन्न वाढविणे हा आहे.
राज्यातील सात सागरी जिल्ह्यांतील १४ मच्छीमार सहकारी संस्थांची निवड या योजनेअंतर्गत करण्यात आली होती. यातील जय मल्हार मत्स्यव्यवसाय विविध कार्यकारी संस्था, मुंबई शहर या संस्थेचा प्रस्ताव एनसीडीसी, दिल्ली यांच्याकडून मंजूर झाला आहे. प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत राबविण्याच्या निर्देशानुसार या नौकांचे बांधकाम उडुपी कोची शिपयार्ड लिमिटेड, मालपे (कर्नाटक) येथे करण्यात आले आहे.
प्रत्येक नौका १८ ते २२ मीटर लांबी, ४०० ते ६०० एचपी इंजिन क्षमता, स्टील हल (Hull) बांधणी, रेफ्रिजरेटेड फिश होल्ड, तसेच जीपीएस, इको साऊंडर, व्हीएचएफ रेडिओ, एआयएस आणि रडार यांसारख्या अत्याधुनिक नेव्हिगेशन व संप्रेषण प्रणालींनी सुसज्ज आहेत. या नौका १० ते १५ दिवसांच्या बहुदिवसीय मासेमारी मोहिमांसाठी योग्य असून, ट्यूना लाँगलाईन व गिलनेट ऑपरेशन्ससाठी सक्षम आहेत. सर्व सुरक्षा मानके डीजी शिपींग यांच्या नियमानुसार आहेत.
या प्रकल्पाचा एकूण खर्च ₹२०.३० कोटी असून त्यामध्ये पुढील निधी घटकांचा समावेश आहे:
एनसीडीसी कर्ज सहाय्य: ₹११.५५ कोटी
केंद्र हिस्सा : ₹४.०३ कोटी
राज्य हिस्सा : ₹२.६८ कोटी
लाभार्थी संस्था हिस्सा: ₹२.०३ कोटी
या योजनेस केंद्र शासनाकडून दि. २७ मार्च २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
या दोन नौकांच्या उद्घाटनामुळे महाराष्ट्रात खोल समुद्रातील शाश्वत मासेमारीचा नवा अध्याय सुरू होणार असून —मच्छीमार सहकारी संस्थांना खोल समुद्रात बहुदिवसीय मासेमारी करता येईल, किनारी मासेमारीवरील दडपण कमी होईल, “डीप सी ट्यूना फ्रॉम महाराष्ट्र” या उपक्रमांतर्गत ट्यूना निर्यातीस चालना मिळेल, ब्लू इकॉनॉमी सशक्त होईल, आणि किनारी मच्छीमारांचे उत्पन्न वाढेल.
हा प्रकल्प आधुनिक मासेमारी तंत्रज्ञान, शीतसाखळी सुविधा व सहकारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी — विशेषतः एसडीजी १२ (जबाबदार उपभोग व उत्पादन) आणि एसडीजी १४ (पाण्याखालील जीवन) — सुसंगत आहे. त्यामुळे पर्यावरणीय समतोल राखत मच्छीमारांच्या उपजीविकेचे शाश्वतीकरण साध्य होणार आहे.



















