सोलापूर- अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई गावातील मातंग समाजाच्या तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये मातंग समाजाने रविवारी आक्रमक भूमिका घेत सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संतप्त समाजबांधवांनी टायर जाळू रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
मातंग समाजावरील होणारे अन्याय भाजपने थांबविले पाहिजेत. अन्यथा राज्य, देशामध्ये आंदोलन उभे करू असा इशारा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रोहित खिलारे , कार्याध्यक्ष नितीन लोखंडे यांनी दिला. टायर जाळल्यामुळे महामार्गावर धुराचे लोट पसरले होते.

डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने रास्तारोको केल्याने वाहन धारक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अहिल्यानगर जिल्ह्यातील मातंग समाजातील तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूरा रास्तारोको करण्यात आला. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मद्देवस्ती येथे संतप्त मातंग समाजबांधवांनी हे आंदोलन केले.
या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रास्तारोकोची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासनाने तातडीने धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.

आंदोलकांनी रुग्णवाहिकेला करून दिली वाट
सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग येथे रविवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रुग्णवाहिकेच्या गाडीचा सायरनचा आवाज येताच आंदोलकनीमधील एकाने मार्गाने वाहतूक सुरू ठेवून रुग्ण वाहिकेला वाट करून दिली.




















