पंढरपूर – राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील नगरपालिका तसेच नगरपंचायतीच्या निवडणूका लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासना बरोबरच स्थानिक प्रशासन देखील सज्ज होवू लागले आहे. पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणूकीसाठी नुकतीच मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीवर नागरिकांनी तब्बल १२ हजार ६०० इतक्या हरकती व सूचना दाखल केल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक हरकती व सूचना पंढरपूर नगरपरिषदे मध्ये वाखल झाल्या असल्याचे दिसून येत आहे. या हरकती व सूचनावर येत्या ३१ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
पंढरपूर नगरपरिषदे मध्ये गेल्या ४० वर्षापासून माजी आमदार प्रशांत परिचारक गटाचे वर्चस्व आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र झाले असून त्यांनी सत्तांतर घडविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मोर्वेबांधणी सुरू केली आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासनाने मतदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या मतदार यादीमध्ये प्रभाग क्रमांक सहा मधील अनेक मतदारांची नावे इतर प्रभागांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. तर काही प्रभागांमधील एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे इतर ठिकाणी समाविष्ट करण्यात आली आहेत. यामुळे मतदारातून तीव्र संताप व्यक्त होत असून मतदार यादीमधील नावे गेल्या निवडणुकीत असलेल्या प्रभागां मध्येच असावीत, अशी मागणी मतदारांनी केली आहे.
दरम्यान मतदार यादीवर सुमारे १२ हजार ६०० हरकती व सूचना दाखल झाल्या आहेत. यावर ३१ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार असून यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.




















