वैराग : एकता महिला मंचच्या वतीने दीपावलीनिमित्त खास सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सेल्फी विथ पणती’ या उपक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी अभिनय होलसेल क्लॉथ अँड मार्केट, वैराग (तालुका बार्शी) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बक्षीस वितरण सोहळ्यासोबतच प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शन मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर एकता महिला मंचच्या वतीने मान्यवरांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या निर्भया पथकाचे प्रमुख बाबासाहेब घाडगे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या ‘निर्भया पथका’चे महत्त्व आणि कार्यपद्धती याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच महिलांना स्वतःच्या कायदेशीर हक्कांबद्दल आणि आवश्यक असल्यास कायद्याची मदत कशी घ्यावी, याबद्दल उपयुक्त मार्गदर्शन केले.
डॉ. सई गुंड (स्त्रीरोगतज्ञ) यांनी महिलांना आरोग्य विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले, जे प्रत्येक महिलेसाठी अत्यंत आवश्यक आहे. स्त्रीरोगतज्ञ असल्याने त्यांनी महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. आहार, स्वच्छता आणि नियमित तपासणीचे (check-up) महत्त्व समजावून सांगून महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रेरित केले.तसेच अभिनय सेल्सचे भागवत बनसोडे यांनी महिलांना सक्षमीकरणा संदर्भात मार्गदर्शन करून त्यांना स्वयंपूर्ण बनण्याची प्रेरणा दिली.त्यानंतर ‘सेल्फी विथ पणती’ या उपक्रमातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रथम क्रमांक: भाग्यश्री लाटे
द्वितीय क्रमांक: स्नेहल तळेकर
तृतीय क्रमांक: गीतांजली जोशी
उत्तेजनार्थ: लक्ष्मी सुतार, रत्ना गायकवाड, राणी गवळी, रंजना गवळी आणि सानिया सय्यद यांना सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निर्भया पथकाचे बार्शीचे बाबासाहेब घाडगे, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सई गुंड, अभिनव सेलचे भागवत बनसोडे, वैजनाथ क्षीरसागर, सारिका क्षीरसागर, रोहिणी बनसोडे, चंद्रभागा बनसोडे, तसेच एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती मध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी या कार्यक्रमाला वंदना घोडके, हसीना सय्यद, विद्या जाधव, रत्नप्रभा गायकवाड, सानिया सय्यद, रंजना गवळी, लक्ष्मी सुतार, भाग्यश्री लाटे, स्नेहल तळेकर, गीतांजली जोशी, राणी गवळी इत्यादी सदस्य उपस्थित होत्या.तसेच “दीपावलीच्या पवित्र पर्वावर ‘सेल्फी विथ पणती’ हा उपक्रम राबवण्यामागे महिलांना आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरेशी जोडणे हा मुख्य उद्देश होता.
पणती, जी प्रकाशाचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे, तिच्यासोबत महिलांनी सेल्फी काढून केवळ एक स्पर्धा पूर्ण केली नाही, तर त्यांनी आपली संस्कृती मोठ्या अभिमानाने जपली आणि तिचे दर्शन घडवले. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला सदस्यांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढला आहे, जो त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी ठरेल. महिलांनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेऊन आपली कलात्मकता सिद्ध केली.
एकता महिला मंच भविष्यातही महिलांना प्रेरणा देणारे असे उपक्रम सातत्याने राबवेल.असा संदेश एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर यांनी व्यक्त केला.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना घोडके यांनी केले, तर प्रास्ताविक रत्नप्रभा गायकवाड यांनी केले.तर प्रभाकर क्षीरसागर यांनी उपस्थितांचे आभार मानले.




















