सोलापूर – शहरात दिवाळी संपन्न झाल्यानंतर टेलरिंग व्यवसाईकांनी आपल्या दुकानात उत्साहपूर्ण वातावरणात कडपंचमी ( पांडव पंचमी ) साजरी केली. कडपंचमी निमित्त टेलर बंधूंनी दुकानात महालक्ष्मी पूजा करून फटाके फोडले आणि आनंदोत्सव साजरा केला.
दरम्यान, हिंदू धर्मातील प्रमुख दिवाळी सण नुकताच संपन्न झाला. वसुबारसने सुरू झालेला दिवाळी सण धनत्रयोदशी, त्यानंतर नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा आणि शेवट भाऊबीजने झाला. दीपावलीच्या या मंगलमय काळात अनेकांना नवनवीन कपडे शिवून देण्यासाठी व्यस्त असणारे टेलर व्यवसायकांनी रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कडपंचमीचा शुभ मुहूर्त साधून आपला दिवाळी सण साजरा केला. यानिमित्ताने दुकानात झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली होती. ऊस, केळीचे पान, विड्याचे पान, पूजापान, अशा विविध प्रासादिक साहित्यांनी सुहासिनी महिलांनी लक्ष्मीपूजन संपन्न केले. यावेळी लक्ष्मी मातेला व श्रींना मिष्ठान्नचे नैवेद्य अर्पण करण्यात आले. त्यानंतर फटाके उडवून आनंद साजरा केला.
यावेळी प्रियंका लेडीज टेलर दुकानात लक्ष्मीपूजन संपन्न झाले. यावेळी जयकुमार मुसळे, जगदीश मुसळे, आनंद मुसळे, जनाबाई मुसळे, सोनाली मुसळे, मनीषा मुसळे, आशा बत्तूल, साक्षी म्हेत्रे आदींची उपस्थिती होती.
ग्राहकांना प्रथम प्राधान्यक्रम
टेलरिंग व्यवसाय करताना ग्राहकांना सर्वोच्च मानून सेवा दिली जाते. नवीनवीन पद्धतीने कपडे शिवून देण्यासाठी टेलर व्यवसायिक तत्पर असतात. म्हणून दिवाळी काळात ग्राहकांची मोठी गर्दी दुकानात असते. अशावेळी ग्राहकांना सण साजरा करण्यासाठी सेवा देणे कर्तव्य असते. त्यामुळे दिवाळी संपन्न झाल्यानंतर पांडवपंचमी अर्थात कडपंचमी आम्ही साजरी करतो.
– आनंद मुसळे, टेलरिंग व्यावसायिक.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी कडपंचमी उत्साहात साजरी.
दिवाळी सणांमध्ये ग्राहकांना कपडे शिवून देण्यामध्ये आम्ही व्यस्त असतो. त्यामुळे दिवाळीत सण साजरा करणे जमत नाही. त्यासाठी कडपंचमी हा दिवस आमच्या बांधवांना राखून ठेवलेला असतो. याला पांडव पंचमी देखील म्हणतात. लक्ष्मीपूजन आणि पाडवा पूजन प्रमाणे हा धार्मिक विधी केला जातो.
– अजय गड्डम, टेलरिंग व्यावसायिक.
कडपंचमीच्या उत्साहात सहभागी होऊन आनंद साजरा करतो.
दिवाळीत टेलर व्यवसायिकांकडून कपडे शिवून घेतले जाते. यावेळी ग्राहकांची मोठी संख्या दुकानात असते. त्यामुळे त्यांना दिवाळीचा सण साजरा करता येत नाही. म्हणून दिवाळी झाल्यानंतर ते कडपंचमीला सण साजरा करतात. तेव्हा आम्ही देखील त्यामध्ये सहभागी होतो.
– अश्विनी गाडे, ग्राहक.
पहिल्या छायाचित्रात मांडण्यात आलेली लक्ष्मीपूजा तर दुसऱ्या छायाचित्रात आपल्या प्रियंका लेडीज टेलर दुकानात लक्ष्मीपूजन करताना मुसळे परिवार दिसत आहे.




















