मुंबई : छठ महापर्व हे भारतीय संस्कृतीचे एक अद्वितीय उदाहरण आहे. हे पर्व शिस्तबद्धता, पवित्रता आणि सामूहिक श्रद्धेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जुहू चौपाटी येथे छठ उत्सव महासंघ यांच्या वतीने आयोजित छठ महापर्व या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार अमित साटम, माजी आमदार कृपाशंकर सिंह, संजय पांडेय, मोहन मिश्र, दिवाकर मिश्र, विमल मिश्र बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

छठ महापर्वच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छठ पर्वामध्ये प्रथम मावळत्या सूर्याला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिले जाते, जे आपल्या संस्कृतीतील नम्रता आणि उदारतेचे अद्भुत प्रतीक आहे. छठ महापर्व साठी २०१४ पासून महानगरपालिकेच्या वतीने विविध सुविधा देण्यात येत आहेत, अशाच अधिक सुविधा दरवर्षी देण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी छठ उत्सव महासंघाच्यावतीने ‘सूर्य पथ’ या छठ पर्व विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
००००




















