सोलापूर – प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन राज्यातील विविध मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) राज्यातील ई-बस प्रवाशांसाठी मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत प्रवाशांना ६० दिवसांचे भाडे भरून ९० दिवस प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय जाहीर केला. प्रवाशांकडून ई-बस सेवेत पास प्रणाली सुरू करण्याची मागणी होत होती. विशेषतः नोकरी किंवा व्यवसायानिमित्त रोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यायोजनेचा लाभ होणार आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील ४४८ बसेस आणि शिवाई प्रकल्पातील ५० ई-बसेस कार्यरत आहेत. या बसेसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा मानस असल्याचेही परिवहन मंत्र्यांनी सांगितले. सोलापूर विभागातील ई-बसही या योजनेनुसार धावणार आहेत.
पासेस सवलत योजनेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.
एसटी महामंडळाच्या सगळ्याच एसटी बसेसना यापूर्वी जी योजना होती, तीच योजना आता ई-बससाठी देखील सुरू केली आहे. सोलापूर विभागात एकूण ३९ ई-बस आहेत. सोलापूर व पंढरपूर या दोन आगारातून या बस धावत आहेत. प्रवाशांनी या संधीचा लाभ घ्यावा.’
– अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक
पास योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
९ मीटर ई-बस, १२ मीटर ई-बस आणि ई-शिवाई सेवा (ई-शिवनेरी वगळून).
मासिक पास (३० दिवस) : २० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून ३० दिवस वैध.
त्रैमासिक पास (९० दिवस) : ६० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून ९० दिवस वैध.
उच्च सेवा वर्गाचा (ई-बस) पास असलेले प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमधून प्रवास करू शकतात.
निमआराम किंवा साध्या बसचा पासधारक ई-बसने प्रवास करत असल्यास, दोन्ही सेवा वर्गातील भाड्याचा फरक १०० टक्के दराने भरावा लागेल.


















