सोलापूर : दिवाळी सणादरम्यान शहरातील केवळ ७३१ मिळकतदारांनी १ कोटी २ लाख ३० हजार ६३४ रुपयांचा कर भरणा केला आहे. महापालिकेच्या अभय योजनेनंतर थकबाकीदारांचा थंडा प्रतिसाद मिळाला आहे.
दरवर्षी दिवाळीचा हा सण मोठ्या आनंदात साजरा करतानाच शहरातील मिळकतदारांकडून दिवाळी कालावधीत मोठ्या प्रमाणात मिळकत कर भरला जातो. मात्र यंदाच्या दिवाळी कालावधीत केवळ ७३१ मिळकतदारांनी १ कोटी २ लाख ३० हजार ६३४ रुपयांचा थकीत कर जमा झाला आहे. दिवाळीपूर्वीच महापालिका प्रशासनाने थकबाकी मिळकतदारांसाठी दंड आणि शास्तीमध्ये १०० टक्के सूट देणारी अभय योजना जाहीर केली होती. यामुळे यंदाच्या दिवाळी कालावधीत थकबाकी मिळकतदारांचा कर भरणासाठी अल्प प्रतिसाद मिळाला.
चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर विभागास ३१८ कोटी ४२ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यानुसार १ एप्रिल ते २५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान २ लाख ६५ हजार मिळकतदारांपैकी १ लाख ६ हजार ३०४ मिळकतदारांनी सूट वगळता एकूण १४१ कोटी ८३ हजार ५१४ रुपयांचा कर जमा केला आहे. महापालिका मालमत्ता कर विभागाला प्रशासनाने दरमहा १६. ७५ कोटी वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार मालमत्ता कर विभागाने दि. १ एप्रिल ते २५ ऑक्टोंबरपर्यंतच्या कालावधीमध्ये दिलेल्या ४१ कोटी ४२ लाख रुपयांच्या सवलतीसह १६० कोटी १९ लाख रुपयांची विक्रमी वसुली आहे.
दरम्यान, महापालिकेच्या अभय योजनेअंतर्गत दि. २१ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर या कालावधीत मिळकत कराची ७२.९९ कोटींची वसुली झाली. या योजनेचा ३४ हजार ७५० मिळकतदारांनी लाभ घेतला. यामुळे दिवाळी सण कालावधीत थकबाकी मिळकत कर भरण्यासाठी दरवर्षीप्रमाणे म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. अद्यापही दीड लाखावर थकबाकीदार मिळकतदार असून लाखावरील थकबाकी मिळकतदारांवर आठवडाभरात वसुलीसह कारवाई मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती विभागाचे अधिक्षक युवराज गाडेकर यांनी दिली.
बड्या थकबाकीदारांच्या याद्या तयार ;
आठवडाभरात कारवाई मोहीम सुरू होणार
महापालिका प्रशासनाने दंड आणि शास्तीमध्ये शंभर टक्के सूट देणारी अभय योजना थकबाकी मिळकतदारांसाठी जाहीर करून त्यांना मोठी संधी दिली होती. यानंतरही अद्यापही मोठ्या प्रमाणात थकबाकी मिळकतदार राहिले आहेत. सध्या महापालिका प्रशासनाकडून मोठ्या थकबाकीदारांना नोटिसा बजावून त्यांच्या मिळकतीवर महापालिकेचा बोजा चढविण्याची कार्यवाही सुरू आहे. शिवाय या मिळकतीच्या लिलावाची प्रक्रिया देखील राबविण्यात येत आहे. याबरोबरच आता आणखी मोठ्या थकबाकीदारांची यादी विभागाकडून तयार करण्यात आली असून त्यांच्यावर आठवडाभरात कारवाई मोहीम सुरू होणार असल्याचे सांगितले.


















