सोलापूर : शहरात ज्या सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे तुटलेले आहेत, पाण्याच्या टाक्या खराब झालेल्या आहेत किंवा पाण्याची व्यवस्था सुरळीत नाही, अशा ठिकाणांबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा आणि त्या प्रस्तावाच्या आधारे आवश्यक दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज शहरातील विविध सार्वजनिक शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान मधुकर उपलप वस्ती, रामवाडी, मोदी, कुंभार गल्ली आणि लष्कर या परिसरांतील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती पाहण्यात आली. त्यावेळी आयुक्तांनी हे आदेश दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विणा पवार, उपायुक्त तैमूर मुलाणी, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक वाहन अनिल चराटे तसेच मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचारी उपस्थित होते.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती व देखभाल कामांना वेग देण्यात आला असून, त्या अनुषंगाने आयुक्तांनी स्वतः प्रत्यक्ष स्थळभेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सफाई कामगार वेळेवर उपस्थित राहतात का ? पाण्याचा पुरवठा नियमित आहे का ? पाण्याचे टँकर वेळेवर पोहोचतात का ? शौचालयांची स्वच्छता नियमित केली जाते का ? याबाबत सविस्तर माहिती घेतली. ड्रेनेज लाईन चोकअप होणार नाही याबद्दल विभागीय अधिकारी यांनी तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.


















