सोलापूर – ग्रामपंचायतीचा कर थकविल्याप्रकरणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडगाव-शिर्पनहळ्ळी येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच रुपाली प्रशांत लोहार व सदस्या रेणुका काशीनाथ बिराजदार यांना आपल्या पदावर पाणी सोडावे लागणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दोघींनाही दणका देत सरपंच व सदस्यत्व रद्द केले आहे.
विशेष म्हणजे सरपंच रुपाली लोहार यांना दुसर्यांदा अपात्र ठरविले आहे. यापूर्वीही ठेकेदारांची बिले अडविल्याप्रकरणी लोहार यांचे सरपंचपद विभागीय आयुक्तांनी रद्द ठरविले होते. या कारवाईला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असून हे प्रकरण प्रलंबित आहे. आता सरपंचपदाची मुदत संपायला साडेतीन महिने शिल्लक असताना दुसर्यांदा पद गमावण्याची नामुष्की लोहार यांच्यावर ओढवली आहे.
केवळ 14 हजार 931 रुपयाचा कर थकविल्याने सरपंच लोहार यांचे सदस्यत्व व सरपंचपद तर 2 हजार 954 रुपयाचा कर थकीत राहिल्याने सदस्या रेणुका बिराजदार यांचेही सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
याप्रकरणी सिध्दाराम नागनाथ दिंडुरे यांनी सरपंच रुपाली लोहार व सदस्या रेणुका बिराजदार यांची पदे रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे केली होती. याप्रकरणी पहिली सुनावणी 21 फेब्रुवारी 2023 तर अंतिम सुनावणी 14 ऑक्टोबर 2025 रोजी झाली. दोन्ही बाजुंच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी सरपंच लोहार व सदस्या बिराजदार यांची पदे रद्द केली. जिल्हाधिकार्यांच्या या निर्णयाने कर थकविणार्या व अतिक्रमण करणार्या ग्रामपंचायत सदस्य व आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यात सिध्दाराम दिंडुरे यांच्यातर्फे अॅड. लक्ष्मीकांत गवई तर अपात्र ठरलेल्या सरपंच लोहार व सदस्या बिराजदार यांच्यातर्फे अॅड. शरद पाटील यांनी काम पाहिले.
यापूर्वीही सरपंच लोहार या गावात राहत नसल्याने विकासकामे ठप्प झाली होती तसेच विकासकामे केलेल्या ठेकेदारांची बिले न काढता त्यांची अडवणूक केली जात असल्याची तक्रार उपसरपंच सिध्दाराम बिराजदार यांनी केली होती. त्यावरुन त्यांचे सरपंचपद रद्द झाले होते. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.


















