दाक्षिणात्य सिनेविश्व आणि राजकारणातील लोकप्रिय नंदामुरी कुटुंबातील सदस्य, ज्युनियर एनटीआरचा चुलत भाऊ आणि अभिनेता नंदामुरी तारक रत्नची प्रकृती चिंताजनक असल्याचे माहिती समोर आली आहे. अलीकडेच एका पदयात्रेदरम्यान अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर तातडीने तारकला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तारक रत्नबाबत समोर आलेल्या हेल्थ अपडेटनुसार, तो कोमामध्ये गेला आहे. परिणामी अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक आहे.
अभिनेत्याला रुग्णालयात भेटण्यासाठी नातेवाईक आणि चाहत्यांनी गर्दी केली होती. दरम्यान नंदामुरी कुटुंबातील अनेक सदस्यही रुग्णालयात आहेत. नंदामुरी कुटुंब हे राजकारणाातीलही वजनदार कुटुंबअ असल्याने तारकची विचारपूस करण्यासाठी काही राजकीय मंडळीही पोहोचली. दरम्यान सोशल मीडियावरही तारकचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. तारकच्या बाबतीत रॅलीमध्ये अशी घटना घडल्यापासून त्याचे नाव ट्विटरवर ट्रेंड होतेय.
तारकच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक अन् चाहतेही बंगळुरू येथील नारायण हृदयालय रुग्णालयात पोहोचले आहेत. ज्युनियर एनटीआर आणि कल्याण राम यांचे कुटुंबीयही रुग्णालयात आहेत. दरम्यान, तारकचे चुलत भाऊ नंदामुरी चैतन्य कृष्णाने अभिनेत्याच्या प्रकृतीची माहिती माध्यमांना दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तारकची प्रकृती अजूनही गंभीर आहे. तो कोमात आहे. सोमवारपर्यंत तारकच्या प्रकृतीविषयीची अपडेटेड माहिती डॉक्टरांकडून येण्याची अपेक्षा आहे.
नंदामुरी तारक रत्न ‘RRR’ फेम अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि कल्याण राम यांचा चुलत भाऊ असून तो अभिनेते आणि आंध्र प्रदेश (युनायटेड) चे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नंदामुरी तारक रामा राव यांचा नातू आहे. तो नंदामुरी बालकृष्ण आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नारा चंद्राबाबू नायडू यांचा भाचा आहे. अभिनय क्षेत्रात तारक विशेष कार्यरत असून त्याने विविध खलनायकी भूमिका साकारल्यात.
तारक बेशुद्ध होऊन कोसळण्याची घटना शुक्रवारी घडली. जेव्हा तो त्याचा आतेभाऊ नारा लोकेश यांच्या युवगलम पदयात्रेमध्ये सहभागी झालेला. नारा लोकेश हे राजकीय वर्तुळातील मोठे नाव आहे. या यात्रेत तारक कोसळला आणि बेशुद्ध झाला होता. रॅली सुरू झाल्यानंतर लोकेश कुप्पम परिसरातील मशिदीत नमाज अदा करण्यासाठी थांबलेले. त्यावेळी तारकही उपस्थित होता. या भावंडांसह टीडीपी कार्यकर्तेही होते. मशिदीतून बाहेर पडल्यावर लोकेश यांना गोंधळ ऐकू आला. पाहिले तेव्हा लक्षात आले की तारक यांना चक्कर आली होती. कुप्पममधील रुग्णालयामध्येच तारकला भरती करण्यात आले आणि त्यानंतर बंगळुरुमध्ये हलवण्यात आले.