जालना : शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांबाबत अभिनव महाराष्ट्र पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे मंगळवार, दि. २८ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू झाले आहे. मात्र या आंदोलनाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त करत मराठा क्रांती मोर्चाने या आंदोलनाला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. सरकारने मागण्या तात्काळ मान्य केल्या नाहीत, तर जालना जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला आहे.
जालना येथे बुधवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मोर्चाची जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली.
या बैठकीस राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील, तसेच संतोष गाजरे, अरविंद देशमुख, अशोक पडूळ, संदीप ताडगे, पंकज जऱ्हाड, शरद देशमुख, राजेंद्र गोरे, ज्योतीराम माने, मच्छिंद्र घोगरे, बबनराव गवारे, सुभाष चव्हाण, ॲड. शैलेश देशमुख आणि ॲड. लक्ष्मण उढाण यांसारखे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत बच्चू कडू यांच्या आंदोलनातील प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व सदस्यांनी एकमुखाने निर्णय घेतला की, सरकारने शेतकरी आणि दिव्यांगांसाठी तातडीने ठोस निर्णय घेतला नाही, तर मराठा क्रांती मोर्चा जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करून शासनाला जाग आणेल.
बैठकीत नेत्यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, अजूनही अनेक शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहेत. सरकारने दिलेली कर्जमाफी पूर्णत्वाला गेलेली नाही, आणि रब्बी हंगाम दारात उभा आहे. शेतकरी संकटात असताना शासन मात्र मौन बाळगून आहे, अशी टीका करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाने यावेळी दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांनाही पाठिंबा दिला आहे. दिव्यांगांच्या सन्मानासाठी स्वतंत्र कल्याणकारी योजना, शासकीय नोकऱ्यांमधील राखीव जागांची भरती आणि पेन्शनवाढ याबाबत राज्य सरकारकडून ठोस निर्णय व्हावा, अशी मागणी मोर्चाने केली. बैठकीनंतर बोलताना राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील म्हणाले, बच्चू कडू यांनी घेतलेला लढा हा सामान्य जनतेचा आवाज आहे. शेतकरी, कामगार, दिव्यांग, युवक — या सर्वांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले तर आम्ही जालना जिल्हाभर शांततामय पण तीव्र आंदोलन उभारू. मोर्चाने पुढील काही दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं आणि तहसील पातळीवर जनआंदोलन उभारण्याची तयारी सुरू केल्याचे संकेतही दिले आहेत. मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट इशारा दिला आहे की, बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनातील मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर शासनाला खऱ्या अर्थाने जनआक्रोशाचा सामना करावा लागेल. त्यामुळे आता सरकारकडून या आंदोलनाकडे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे राज्याचे आणि विशेषतः जालना जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


















