सोलापूर : मिशन स्वाभिमान कर संकलन मोहीमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातून केवळ चार दिवसात जवळपास चार कोटी ५६ लाख २७ हजार ७७२ रूपयाची कर वसुली झाली आहे. या मोहीमेत सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतींचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतींच्या आर्थिक जिल्हा सबलीकरणासाठी परिषदेमार्फत मिशन स्वाभिमान करसंकलन
वसुली कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश ग्रामपंचायतींच्या स्वनिधीत वाढ करून स्थानिक विकासकामांना गती देणे हा असून, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात उत्साहाने सहभाग घेतला आहे. या अभियानांतर्गत १४ ऑक्टोबर २०२५ ते १७ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यातून जवळपास ४ कोटी ५६ लाख रूपयाची घरपट्टी व पाणी पट्टी वसुली करण्यात आली आहे. या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी करून सर्वाधिक वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री समृध्द गाव अभियांनातील हा कर संकलन हा एक भाग आहे. त्यासाठी तीन हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील अधिक कर संकलन करणाऱ्या तीन ग्रामपंचाती आणि तीन हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या कर संकलन अधिक केलेल्या तीन ग्रामपंचाती अशा जवळपास सहा ग्रामपंचायतीची निवड करण्यात येणार आहे. त्यांचा सन्मान करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. ही मोहिम मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ तसेच सर्व तालुका गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांच्या परिश्रमातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.
करसंकलन मोहीमेत सर्वाधिक सांगोला तालुक्यातून ७६ लाख रुपयांची तर सर्वात कमी दक्षिण सोलापूर तालुक्यातून १२.४५ लाखांची वसुली झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातून १०.२२ लाख घरपट्टी तर ५.२४ लाख पाणीपट्टी वसूल केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातून ११ लाख ७३ हजार घरपट्टी, ७१ हजार पाणीपट्टी वसूल केली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात १५ लाख ९३ हजार घरपट्टी, ४ लाख ८३ हजार पाणीपट्टी वसूल केली आहे. माळशिरस तालुक्यात घरपट्टी ३२ लाख ८७ हजार, पाणीपट्टी १४ लाख ४० हजार वसूल केली आहे. बार्शी तालुक्यात ३१ लाख ५४ हजार घरपट्टी तर पाणीपट्टी २५ लाख २ हजार वसूल केली आहे. मंगळवेढा तालुक्यात ३४ लाख ४३ हजार घरपट्टी तर १६ लाख ४२ हजार पाणीपट्टी वसूल करण्यात आली.
…..
स्वाभिमान कर संकलन मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मागील थकीत व चालू करांपैकी ४ कोटी ५६ लाख रुपयांची वसुली झाली आहे. ज्या ग्रामपंचायतीने सर्वाधिक वसुली केली आहे, त्यांना बक्षीस स्वरूपात विकास कामे देण्यात येणार आहे. याबाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे.
– सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.


















