सोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसभा खा. शरद चंद्र पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला स्वतः न जाता सोलापूर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी चक्क भाजप कार्यकर्त्याला पाठवले. यामुळे संतप्त झालेल्या जुन्या निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खरटमल यांच्या कार्यालयात धडक देऊन त्याना जाब विचारला.
शरदचंद्र पवार यांनी मंगळवारी मुंबई येथे सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादीची बैठक बोलावली होती. जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष सर्व लोकप्रतिनिधी यांच्यासह काही निवडक ज्येष्ठ नेत्यांना बैठकीचे निमंत्रण होते. शहरातून ज्येष्ठ नेते महेश गादेकर, भारत जाधव आणि एडवोकेट यू एन बेरिया उपस्थित होते. या बैठकीस शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दांडी मारली. स्वतः शहराध्यक्ष खरटमल बैठकीला गेले नाहीत परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून भाजप कार्यकर्ता महेश गाडेकर याला पाठवले. त्यांच्या या प्रतापाने राष्ट्रवादीचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच भडकले. बुधवारी सायंकाळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खरटमल यांना याचा जाब विचारला. त्यावर खरटमल यांनी उलट उत्तर देत आपल्याला काहीच फरक पडत नसल्याचे सांगितले.
महेश गाडेकर हा कुठल्या पक्षाचा आहे याचे मला काही देणे घेणे नाही. तो माझा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी त्याला पाठवले असे उत्तर खरटमल यांनी दिले. पक्षाने कधीही बैठक बोलावल्यावर मी जायला रिकामा नाही. मी बिझनेसमन आहे. त्यामुळे मी बैठकीला गेलो नाही असे सांगत चक्क शरदचंद्र पवार यांचा आदेश मानत नसल्याचे सांगितल्याची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यामुळे जुन्या व पवारनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला आपल्याला जाता येत नसेल तर शहराध्यक्ष म्हणून काम का करत आहात असा जाब पदाधिकाऱ्यांनी विचारला. शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या या कारणामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एकच खळबळ उडाली आहे.
यावेळी मनोहर सपाटे, प्रशांत बाबर, चंद्रकांत पवार, महेश कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


















