टेंभुर्णी – टेंभुर्णीपासून काही अंतरावर असलेल्या भिमनगर-रांजणी हद्दीतील उजनी धरणालगतच्या उजनी डाव्या कालव्यात हातपाय बांधलेल्या अवस्थेत एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
टेंभुर्णी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ ते ३० वयोगटातील एका तरुणाचा हातपाय बांधून त्याला कालव्यात दगड बांधून टाकण्यात आले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर मृतदेहावर काळा शर्ट आणि काळी जीन्स पॅन्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या तरुणाला गळा वळून हातपाय बांधून टाकून दिल्याची आज पहाटे घटना घडल्याचे अंदाज वर्तवला जात आहे
घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु आहे. प्राथमिक पाहणीवरून हा प्रकार संशयास्पद असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
दरम्यान, सदर अज्ञात मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी टेंभुर्णी पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे.
कोणाला या मृत व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास किंवा ओळख पटत असल्यास त्यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा 9763523849 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
	    	 
                                




















 
                