सोलापूर : सन 2017 मध्ये झालेल्या सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या महापालिका निवडणुकीत सुमारे 2 लाख 50 हजार मतदार वाढले आहेत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आरक्षण सोडत आणि मतदार याद्या पडताळणी व छाननीचे काम सुरू आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आवश्यक ती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत प्रक्रियेचे नियोजनही आदेशानुसार करण्यात येत आहे. 11 नोव्हेंबर रोजी प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम आहे. त्यानुसार रंगीत तालीमही करण्यात येणार आहे. दरम्यान सन 2017 मध्ये झालेल्या सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 6 लाख 73 हजार मतदार होते. यंदाच्या 2025 च्या निवडणुकी करिता मतदार मतदार संख्येत नैसर्गिक वाढ झाली आहे. 2 लाख 50 हजार ते पावणेतीन लाख मतदारांची वाढ यंदा झाली आहे. एकूण 9 लाख 50 हजार मतदार यंदा असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीच्या आधारे प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम सुरू आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार एकूण २६ प्रभागांकरिता प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामकाजाच्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागाकरिता स्वतंत्र टीम नियुक्त करण्यात आली आहे.
या कामासाठी नियुक्त टीमकडून प्रभागनिहाय घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून, प्रभागाच्या निश्चित हद्दीनुसार मतदारांची माहिती पडताळून पाहणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेद्वारे अंतिम मतदार यादीत समाविष्ट होणाऱ्या मतदारांची नोंद तपासून, प्रभाग निहाय मतदार याद्या करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मतदान केंद्र निश्चितीकरण ही केले जाणार आहे. महापालिका झोन अधिकारी आणि अभियंता यांच्याकडून त्यासाठी पाहणी केली जात आहे. आयोगाच्या निर्देशानुसार साधारणतः 850 ते 900 मतदारांसाठी एक मतदान केंद्र उपलब्ध केले जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी खाजगी ठिकाणीही मतदान केंद्र केले जाणार आहे. केंद्रावर अधिक गर्दी होणार नाही याची दक्षता ही घेतली जाणार आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस उपायुक्त आशिष लोकरे, अंतर्गत लेखापरीक्षा राहुल कुलकर्णी, सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे, नियंत्रण अधिकारी तपन डंके आदी उपस्थित होते.
रस्त्यावर रहदारीस रहदारीस अडथळा ठरणारे
अतिक्रमण काढण्याचे आदेश
दरम्यान, दिवाळी सण संपला आहे. सोलापूर शहरात रस्त्यावर रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याचे आदेशही यावेळी महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिले आहेत.
तीन मक्तेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले
शहरात रस्ते केल्यानंतर नियमानुसार तीन वर्षाचा दोष दायित्व कालावधी (डीएलपी) असतो. या काळात रस्ते दुरुस्त न केल्याने तीन मक्तेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. दोष दायित्व कालावधी (डीएलपी) असलेले एकूण 11 रस्ते आहेत, असे नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी सांगितले. दरम्यान, महापालिका हेड आणि झोन निहाय रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची कामे हाती घेण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
892 कोटीच्या योजनेसाठी शासनाकडे पाठपुरावा
अंतर्गत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठीच्या 892 कोटीच्या पाणीपुरवठा योजनेच्या निधी करिता शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपलासाठी शासकीय जागा संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, असे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.
 
	    	 
                                




















 
                