सोलापूर – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. महापालिका पंचवार्षिक निवडणुकांचे आरक्षण सोडत लवकरच जाहीर होणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आगामी महापालिका निवडणुकीचे महत्व लक्षात घेता, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अहवाल तसेच इच्छुक उमेदवारांचा स्वतःचा कामाचा लेखाजोखा सज्ज ठेवण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची एकच धावपळ सुरू असल्याचे चित्र राष्ट्रवादी पक्षामध्ये दिसून येत आहे.
दरम्यान, काही दिवसापूर्वी सोलापूर दौऱ्यावर आलेले. सोलापूरचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अनेक कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. स्वबळाचा नारा देत, सोलापूर महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढण्यासाठी तयार व्हा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच इच्छुक आणि आजी-माजी नगरसेवकांनी देखील कंबर कसलेली दिसत आहे. पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आजी-माजी नगरसेवक तसेच इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी घेत आहेत. बैठका आणि चर्चामधून महापालिकेच्या कोणत्या जागेसाठी कोणता उमेदवार असावा याची चाचपणी करत आहेत. तर दुसरीकडे महापालिकेची निवडणूक ही महायुतीतून किंवा स्वबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुरू आहे. आपल्याच महायुतीतील मोठ्या भावाने पक्ष फोडून आपल्या पक्षातील नेत्यांचे घाऊक इनकमिंग केल्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांच्या दौऱ्यानंतर संजीवनी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
नोव्हेंबर महिन्यात अजित पवार यांचा दौरा
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, पक्षाची तसेच पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी अजित पवार सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. पक्षाचा आढावा तसेच उमेदवारांच्या निश्चितीसाठी चर्चा बैठका होणार आहेत. तशा बैठका दररोज सुरू आहेत. या बैठकांचा अहवाल अजित पवार यांना देण्यात येईल. त्यानंतर निवडणुकीच्या अनुषंगाने कामकाज केले जाईल.
– संतोष पवार, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
 
	    	 
                                




















 
                