सोलापूर – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रित स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचा 14 वर्षाखालील संघ पुण्याकडे रवाना झाला असून सामने 30 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत पुणे येथे पार पडणार आहेत.
या पार्श्वभूमीवर, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजीतसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष दिलीप माने, व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे, उपाध्यक्ष प्रकाश भुतडा, मुकुंद जाधव, नितीन देशमुख, सचिव खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सहसचिव चंद्रकांत रेंबर्सू आणि खजिनदार संतोष बडवे यांच्या संकल्पनेतून संघटनेतर्फे खेळाडूंच्या हितासाठी विविध नवनवीन योजना राबविण्यात येत आहेत.
या उपक्रमांतर्गत आज 14 वर्षाखालील सर्व खेळाडूंसाठी एक लाख रुपयांचा विमा (इन्शुरन्स) सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे काढण्यात आला असून त्याचा चेक इन्शुरन्स एजंट जॉय म्हेत्रस यांना देण्यात आला. हा चेक सुपूर्द करताना सोलापूर शहर भाजपचे माजी अध्यक्ष माननीय नरेंद्रजी काळे यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी प्रकाश भुतडा, सचिव चंद्रकांत रेंबर्सू, सुनील मालप, निलेश गायकवाड, इन्शुरन्स एजंट जय म्हेत्रस तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेने महाराष्ट्रात प्रथमच खेळाडूंसाठी तसेच त्यांच्या पालकांपैकी एकासाठी मिळून दोन लाख रुपयांची इन्शुरन्स योजना सुरू केली आहे. या योजनेत हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च समाविष्ट असून, हा खर्च संघटनेतर्फे करण्यात येतो.
या अभिनव उपक्रमामुळे सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचा महाराष्ट्रात एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे.
 
	    	 
                                




















 
                