लातूर : पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता चळवळ या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून लातूरचे नाव संपूर्ण राज्यात गाजविणाऱ्या ‘वृक्ष प्रतिष्ठान, लातूर’ या संस्थेने आता आपली भरारी सप्तसागराच्या पलीकडे घेतली आहे. या संस्थेच्या संस्थापिका व प्रमुख कार्यकर्त्या सुनंदाताई जगताप यांना युरोप खंडातील आयर्लंडमधील डब्लिन शहरातील ‘Dun Laoghaire Tidy Town’ या स्वच्छता उपक्रमाशी जोडून काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
‘वृक्ष प्रतिष्ठान’ हे सुनंदाताई जगताप यांच्या स्वप्रयत्नातून उभे राहिलेले एक पर्यावरणाभिमुख सामाजिक व्यासपीठ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लातूर शहरात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, परिसर स्वच्छता, तसेच प्लास्टिकमुक्तीच्या मोहिमा अशा विविध उपक्रमांद्वारे या संस्थेने शहराच्या सौंदर्यात भर घातली आहे. त्यांच्या या कार्यामुळे लातूरच्या हरित उपक्रमांना नवा आयाम मिळाला आहे. सुनंदाताईंच्या समाजाभिमुख कार्याची दखल अनेक प्रतिष्ठित संस्थांनी घेतली असून त्यांना आजवर एक डझनहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात –
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा ‘समाजभूषण’ (2022),
The Real Super Woman Award (2022), राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार (2022), इंदिरा महिला बँक आदर्श महिला (2023), जिजाऊ ब्रिगेड आदर्श महिला (2023),
ग्लोबल ट्रेंड सेंटर, अमेरिका कडून “100 Powerful Women of the World” (2023), आणि शिवाई प्रतिष्ठान लातूरचा पर्यावरण पुरस्कार (2024) असे अनेक मानाचे सन्मान त्यात आहेत.
सुनंदाताईंच्या कार्यामुळे आज वृक्ष प्रतिष्ठानचे शेकडो स्वयंसेवक लातूरमध्ये सक्रिय आहेत. हे कार्य आता सीमारेषांपलीकडे पोहोचले असून त्यांनी आयर्लंडमध्ये ‘Dun Laoghaire Tidy Town’ या संस्थेत सामील होत स्वच्छता, फुलझाडे लावणे, गवत काढणे, तसेच कचरा व्यवस्थापन अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. विशेष म्हणजे, या ग्रुपमध्ये बहुतेक ज्येष्ठ नागरिक सहभागी आहेत आणि त्यांच्यासोबत सुनंदाताई देखील निस्वार्थ भावनेने कार्य करत आहेत.
सुनंदाताईंचे म्हणणे आहे की, “निसर्ग रक्षणासाठी आणि स्वच्छतेसाठी संधी मिळेल त्या प्रत्येक ठिकाणी आपण काहीतरी सकारात्मक योगदान द्यावे, हेच माझे कर्तव्य आहे.” त्यांचे हे उदात्त विचार आणि अथक परिश्रम केवळ लातूरकरांसाठी नव्हे, तर सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहेत. वृक्ष प्रतिष्ठानच्या या आंतरराष्ट्रीय भरारीमुळे लातूरच्या पर्यावरण चळवळीला जागतिक स्तरावर एक नवा मान मिळालेला आहे.




















