छत्रपती संभाजीनगर : शहरातील अकरा रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने आणि रोटरी माजी अध्यक्ष परिषद (कॉप्स) छत्रपती संभाजीनगर यांच्या पुढाकाराने कर्करोग प्रतिबंध, निदान व जागरूकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीस पोलिस अधीक्षक ग्रामीण डॉ. विनयकुमार राठोड आणि शासकीय कर्करोग रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरविंद गायकवाड यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
रोटरी संस्था गेली १२० वर्षे जगभर सामाजिक कार्यात योगदान देत असून सध्या २०० पेक्षा अधिक देशांतील ३५ हजार क्लब आणि १४ लाख सदस्य कार्यरत आहेत. रोटरी जिल्हा ३१३२ अंतर्गत छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांतील १०० पेक्षा जास्त क्लब व चार हजार सदस्य कार्यरत आहेत.
या वर्षी ऑक्टोबर महिना रोटरी जिल्हा ३१३२ मध्ये ‘कर्करोग प्रतिबंध, निदान व जागरूकता महिना’ म्हणून साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत दोन हजारांहून अधिक रोटरी सदस्य व नागरिकांनी महिलांमधील कर्करोग प्रतिबंधासाठी आर्थिक योगदान देत २० लाख रुपयांचा निधी ‘द रोटरी फाउंडेशन’मध्ये जमा केला.
रोटरी जिल्हा ३१३२ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि सातारा येथे फिरते सुसज्ज कर्करोग निदान वाहन ‘रोटरी आशा एक्स्प्रेस’ कार्यरत आहेत. २०२७ पर्यंत आणखी पाच वाहने सुरू करण्याचा रोटरीचा मानस असून या प्रकल्पासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या उपक्रमाची सांगता शासकीय कर्करोग रुग्णालयातून निघालेल्या रॅलीद्वारे झाली. रॅलीच्या आयोजनात पोलिस प्रशासन, वाहतूक विभाग व केअर सिग्मा रुग्णालयाचे अमूल्य सहकार्य लाभले.
या यशस्वी आयोजनासाठी कॉप्स अध्यक्ष हेमंत लांडगे, सचिव अशोक तोष्णीवाल, सहाय्यक प्रांतपाल विवेक कानडे, भरत चोपडे, सरिता लोणीकर, सुरज डुमणे, डॉ. अमोल जोशी, हबिब शेख, रसिका पंतोजी, सागर तोलवानी, स्वाती स्मार्त आदींनी विशेष परिश्रम घेतले.
रोटरी व रोटरॅक्ट क्लबचे विविध अध्यक्ष व सदस्य तसेच ब्राझील येथून रोटरी युथ एक्सचेंज अंतर्गत आलेली यास्मिन हिचा सहभाग विशेष आकर्षण ठरला.
छत्रपती संभाजीनगर शहरात आरोग्यविषयक जनजागृतीसाठी रोटरीचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
























