अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदा २०२३ रोजी पाचव्यांदा बजेट सादर करत आहेत. हा एक रेकॉर्ड असून पहिल्यांदा एखाद्या महिलेने सलग पाच वेळा देशाचं बजेट सादर केलं आहे. दोन दशकांपूर्वी केंद्रीय बजेट संध्याकाळी सादर केलं जात होतं. आता बजेट सकाळी सादर केलं जातं. बजेट संध्याकाळी का सादर केलं जात होतं आणि आता ११ वाजता का सादर केलं जातं?
संध्याकाळी ५ वाजता बजेट सादर करण्याची परंपरा २००१ मध्ये एनडीए सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी बदलली होती. त्यांनी २००१ पासून सकाळी ११ वाजता बजेट सादर करण्यास सुरू केलं. त्यानंतर आजपर्यंत हीच परंपरा सुरू आहे. संध्याकाळी बजेट सादर करण्याची परंपरा देशात ब्रिटिश काळापासून सुरू होती.
ब्रिटनमध्ये बजेट सकाळी ११ वाजता सादर केलं जात होतं. त्यात भारतासाठीही बजेट सामिल असायचं. संध्याकाळी ५ वाजताची वेळ निवडण्यामागे असं कारण होतं, की त्या वेळेला ब्रिटनमध्ये ११.३० वाजत होते. अशाप्रकारे ब्रिटिश सरकारकडून सुरू करण्यात आलेली परंपरा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सुरुच होती. त्यानंतर २००१ मध्ये ही परंपरा यशवंत सिन्हा यांनी बदलली.
दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी सादर होणारं बजेट मोदी सरकारने १ फेब्रुवारी रोजी सादर करण्यास सुरुवात केली. त्याशिवाय मोदी सरकारने ब्रिटिशांपासून सुरू असलेली आणखी एक परंपराही मोडीत काढली. सरकारने सामन्य बजेटहून वेगळं सादर होणारं रेल्वे बजेटही सामन्य बजेटमध्येच सामिल केलं. रेल्वे बजेट वेगळं सादर करण्याची परंपरा मोडित काढण्याचा सल्ला तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिला होता.