नांदेड / देगलूर : तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात यंदा पावसाने अक्षरशः थैमान घातले. सततच्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नदीपात्रालगतची शेतीतील माती सुद्धा वाहून गेली. सोयाबीन, मूग, उडीद यांसारखी पिके पूर्णपणे नष्ट झाली, तर थोड्याफार प्रमाणात केवळ कापूस एवढेच पीक वाचले. कापुस वेचणीची लगबग सुरू आहे. खरीप हंगामात निसर्गाशी संघर्ष तर आता कापुस वेचणीत शेतमजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.
सध्या ग्रामीण भागात कापूस वेचणी सुरु असून शेतकऱ्यांना मजुरांची टंचाई भेडसावत आहे. सध्या कापूस वेचणी दर आठ रुपये ते बारा रुपये प्रती किलो दर देऊनही पुरेसे मजुर मिळत नाहीत. काही गावात देगलूर शहरातील मजूर शेतीसाठी मागविले जात आहेत, त्यामुळे येण्या-जाण्यासाठी लागणाऱ्या प्रवास भाड्याचे अतिरिक्त ओझे शेतकऱ्यांवर पडत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी स्वतःच्या आख्या कुटुंबासह वेचणीसाठी राबताना दिसत आहेत.
दरम्यान, अजूनही अधूनमधून पावसाचे संकेत हवामान खात्याकडून दिले जात असल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत आहे. तरीही शेतकरी निसर्गाशी झुंज देत, परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या या चिकाटीला आणि जिद्दीला संपूर्ण समाजाचा सलामच म्हणावा लागेल!




















