सोलापूर : वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (WIT), सोलापूर येथील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. बब्रुवान रामराव सोळुंके यांना “ऑब्जेक्ट डिटेक्शन यूजिंग नोव्हेल मशीन लर्निंग अल्गोरिदम्स फॉर अॅडव्हान्स्ड ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम (ADAS)” या विषयावरील संशोधनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
स्वयंचलित वाहनांच्या सुरक्षिततेसाठी विकसित केलेल्या त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रणालीमुळे रस्त्यावर दिसणारे वाहन, पादचारी, प्राणी व सिग्नल यांचे अचूक ओळख आणि वर्गीकरण करून अपघात टाळणे शक्य होते. त्यांनी “रॅट स्वार्म हेनरी गॅस सोल्युबिलिटी ऑप्टिमायझेशन प्रशिक्षित डीप क्वांटम न्युरल नेटवर्क” ही अभिनव पद्धत विकसित केली असून ती कमी प्रकाश, धुके व गर्दीतही प्रभावी ठरते.
या यशाबद्दल वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, प्राचार्य डॉ. विजय आठवले, मार्गदर्शक डॉ. सचिन गेंगजे आणि सीएसई विभागप्रमुख डॉ. अनिता पुजार यांनी अभिनंदन करून त्यांच्या संशोधनवृत्तीचे कौतुक केले.
डॉ. सोळुंके यांचे संशोधन हे स्वयंचलित वाहन सुरक्षा तंत्रज्ञानातील मोलाचे योगदान ठरले असून WIT आणि सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे.























