वाशी – धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील शमशानभूमी परिसरात पवनचक्की कंपनीच्या अवजड साहित्याची वाहतूक करणाऱ्या गाडीखाली एक पादचारी चिरडून ठार झाला. ही घटना सोमवारी (दि.१० नोव्हेंबर) रात्री साडेसातच्या सुमारास घडली. सविस्तर माहिती अशी की, कडकनाथवाडी शिवारात पवनचक्की उभारणीची कामे सुरू आहेत. त्यासाठी अवजड साहित्याची वाहतूक सुरू असताना तेरखेडा गावाकडून कडकनाथवाडी दिशेने जाणाऱ्या ट्रकने पादचाऱ्याला जोराची धडक दिली.
या अपघातात दशरथ कुंभार (वय ५५, रा. कडकनाथवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पवनचक्की कंपनीच्या वाहनांची तोडफोड केली. अपघातानंतर वाहन चालकांनी काही अंतरावर वाहने उभी करून पसार झाल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा पोलीस करत आहेत. स्थानिक नागरिकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

























