सोलापूर : सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारूप आरक्षण सोडतीने दिग्गजांना दे धक्का तर कही खुशी कही गम असे चित्र आहे. पूर्वीच्या आरक्षणात फेरबदल झाले. यानुसार प्रस्थापित अनेकांना धक्का बसल्याचे दिसून येते .या आरक्षण सोडतीनंतर शहरातील प्रभागांचे संपूर्ण आरक्षण चित्र आता स्पष्ट झाले.अंतिम प्रभाग आरक्षण दि. 2 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिलासाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता मंगळवारी सकाळी 9.30 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, नगरचना सहसंचालक मनीष भिष्णूरकर ,उपअभियंता महेश शिरसागर , रामचंद्र पेंटर , मिळकतकर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर, निवडणूक कार्यालयाचे अधीक्षक ओमप्रकाश वाघमारे, संगणक विभागाच्या प्रमुख स्नेहल चपळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पाडली. या प्रक्रियेत कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी अजित खानसोळे, संदीप भोसले , प्रदीप निकते, शिवकुमार उदगीरी , गणेश कोळी, रहमान मोगल, सतीश कोळी, मतीन सय्यद, संतोष कलमगार ,निर्मलकुमार शितोळे, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांच्यासह कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. नियमावलीचे वाचन व सूत्रसंचालन प्रभारी नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांनी केले. प्रत्येक टप्प्यावर सोडत आरक्षणाची घोषणा महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली.
आरक्षणाची सोडत पारदर्शक ड्रम मधून महापालिका शाळा क्रमांक दोनमधील कार्तिक गायकवाड (इयत्ता सहावी) प्रसाद इंगळे (इयत्ता सहावी), साक्षी वठार (इयत्ता चौथी) अनुष्का वठार (इयत्ता सहावी) या विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे काढण्यात आली. दरम्यान लिपिक गणेश कोळी यांनी प्रत्येक टप्प्यावर पाच वेळा ड्रम फिरविला तर लिपिक रहमान मोगल यांनी काढलेली सोडत जाहीर रित्या दाखवली.सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाची प्रसिध्दी स्थानिक वर्तमानपत्र, महापालिका वेबसाईट व विभागीय अधिकारी कार्यालय क्र. 1 ते 8 येथे ठेवण्यात येत आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून शहरातील 26 प्रभागात एकूण 102 जागां आहेत. 24 प्रभाग चार सदस्यीय तर 2 प्रभाग 3 सदस्यांचा आहे. 102 जागांपैकी 50 टक्केप्रमाणे महिलांसाठी 51 जागा राखीव आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकूण 15 जागा राखीव असून यामधील 8 जागा महिलांसाठी राखीव तर अनुसूचित जमातीसाठी 2 जागा राखीव असून त्यामधील 1 जागा महिलेसाठी राखीव आहे. ओबीसी व सर्वसाधारण महिलांसाठी सोडतीद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले. 27 टक्के प्रमाणे ओबीसींसाठी 27 जागा राखीव आहेत. त्यामध्ये 14 महिलांसाठी व 14 जागा पुरुषांसाठी राहणार आहेत.
काही प्रभागात बदल
दरम्यान 2017 च्या निवडणुकीप्रमाणेच ही आरक्षण रचना राहील असे मानले जात होते परंतु काही प्रभागांमध्ये बदल झाला असल्याचे स्पष्ट आहे. महिलांसाठी आरक्षित जागा सर्वसाधारण झाली आहे. असे असले तरी एकूण चार सदस्य प्रभाग पद्धती असल्याने प्रत्येकांना संधी मिळणार असल्याचे दिसून येते.
असे आहे महिला आरक्षण
102 एकूण जागेपैकी महिलांसाठी 51 जागा राखीव आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती(एसी) 15 पैकी महिला 8, अनुसूचित जमाती (एसटी) दोन पैकी महिला 1 व सर्वसाधारण एकूण 58 पैकी महिलासाठी 28 जागा आरक्षित असणार आहेत.
सूचना हरकती दाखल करण्यासाठी
कालावधी असा
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आलेली आहे. आता राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी प्रारूप आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. प्रारुप आरक्षणावर हरकती व सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात दि. 17 नोव्हेंबर 2025 ते 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करुन महानगरपालिका आयुक्त हे दि. 25 नोव्हेंबर 2025 ते दि. 1 डिसेंबर 2025 या कालावधीत निर्णय घेणार असून अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात सादर करण्याचा दि. 2 डिसेंबर 2025 असा आहे.
अशी पार पडली आरक्षण सोडत प्रक्रिया
राज्य निवडणूक आयोगानी दिलेल्या सूचनेनुसार
आरक्षण सोडत काढण्यात आली.सोलापूर महानगरपालिकेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढण्याची प्रक्रिया झाली. सुरुवातीला तीन सदस्यांचे दोन प्रभाग आहेत. प्रभाग क्र. २५ व २६ पैकी कोणत्या प्रभागात महिलांच्या दोन जागा देय होतील व कोणत्या प्रभागात महिलांची एक जागा देय होईल हे सोडतीने निश्चित करण्यात आले. प्रभाग 25 ची चिठ्ठी काढण्यात आली. तिथे दोन महिला राखीव निश्चित केले. त्यानंतर प्रभाग 26 मध्ये तीन पैकी एक जागा महिला आरक्षित करण्यात आली. दुसरा टप्प्यात अनुसूचित जातीसाठी आरक्षण प्रक्रिया राबवली उतरत्या क्रमाने लोकसंख्येप्रमाणे जागा आरक्षित करण्यात आल्या. यामध्ये प्रभाग क्रमांक एक, दोन, चार, पाच, सहा, तेरा , 15, 16, 17, 21, 22, 23, 24 , 25, 26 अशा एकूण आरक्षित 15 जागांचा समावेश आहे. ड्रम मधून अनुसूचित जातीसाठीच्या 15 पैकी आठ चिठ्ठ्या महिलांसाठी काढण्यात आल्या. एससी महिला राखीव मध्ये प्रभाग क्रमांक 13, 15, 4, 6 ,21, 25 आणि 17 अशा चिठ्ठ्या निघाल्या आहेत. पुढील टप्प्यात अनुसूचित जमाती (एसटी) साठी प्रक्रिया घेतली. 24 ब अनुसूचित जमाती महिला आणि 26 ब अनुसूचित जमाती असे आरक्षण निश्चित करण्यात आले.नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या (ओबीसी) एकूण २७ जागापैकी प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे २५ जागांचे प्रभागनिहाय वाटप करण्यात आले. उर्वरित २ जागा सोडतीने निश्चित केल्या. दरम्यान ओबीसी महिलांसाठी प्रभाग क्रमांक 14, 19, 1, 2, 5, 16, 22, 23, 12, 9, 3, 8, 11, 6 या एकूण 14 जागा आरक्षित झाल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक 10, 18 आणि 20 या तीन प्रभागात प्रत्येकी तीन महिला जागा आरक्षित झाले आहेत.
एकूण जागांचा तपशील असा
अनुसूचित जाती एकूण 15 जागा ( 8 महिला आरक्षित), अनुसूचित जमाती एकूण दोन जागा (एक महिला राखीव), नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) एकूण 27 पैकी 14 महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण 58 जागांपैकी 28 जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. तरी एकूण 102 जागांपैकी 51 जागा महिलांसाठी आहेत.
आरक्षण सोडती प्रसंगी कमालीची उत्सुकता
हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडलेल्या या आरक्षण सोडती प्रसंगी इच्छुक उमेदवार माझी नगरसेवक माजी पदाधिकारी यांची उपस्थिती होती. प्रत्येक सोडती प्रसंगी उत्सुकता शिगेला जात होती. काही ठिकाणी आरक्षण जैसे ते पडल्याने इच्छुकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, माजी नगरसेवक अरुण भालेराव, विजयी इपाकायल, शौकत पठाण, विनोद इंगळे यांच्यासह राजकीय नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मागील निवडणुकीच्या तुलनेत
ओबीसींची एक जागा कमी ?
2017 च्या सोलापूर महापालिका निवडणुकीत ओबीसींसाठी एकूण 28 जागा होत्या. त्यापैकी 14 जागा महिलांसाठी आरक्षित होत्या. तर यंदाच्या 2025 च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत आज झालेल्या सोडतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) यांच्यासाठी 27 जागा असल्याचे दिसून आले. मागील निवडणुकीच्या तुलनेत ओबीसींची एक जागा कमी आहे. तर मागील निवडणुकीत सर्वसाधारण जागा 57 होत्या आणि यंदा त्या 58 आहेत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले. मागील निवडणुकीत असलेल्या ओबीसींच्या जागेत यंदा एकने घट कशी काय होते ? शासनाने कसा काय नियम बदलला ? असा सवाल माजी ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडी यांनी उपस्थित केला आहे.


























