बार्शी – तालुक्यातील तावडी मेघा गादेकर यांनी प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांचा तावडी येथे गावकऱ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कठीण समजल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेत मेघा गादेकर यांनी धीर, संयम व जिद्द, चिकाटीच्या बळावर संयमाने मिळवलेले यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
मेघा गादेकर यांचे त्यांच्या कुटुंबासह त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळी, गाव, तालुक्यातून कौतुक होत आहे. मेघा गादेकर या तावडी येथील मनोज (नाना) गादेकर यांच्या कन्या आहेत. मेघा यांनी अतिशय कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्द, आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
मेघाचे प्राथमिक शिक्षण बार्शी तालुक्यातील तावडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर इ. ४ ते ७ वी पर्यतचे शिक्षण जिजामाता विद्यामंदिर, बार्शी, इ.८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र विद्यालय, बार्शीत झाले. त्यानंतर ११ वी बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी येथे तर इ.१२ वी मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे येथे झाली. बी.कॉम पुणे विद्यापीठात तर एम कॉमही पुणे विद्यापीठातून झाले आहे.
मेघा मनोज गादेकर यांच्या यशाबद्दल वखारिया विद्यालयाचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर, प्रकाश डमरे, तानाजी गोडगे तसेच रेवडकर कुटुंबीयासह डमरे ,गोडगे, गटकळ कुटुंबियांनी अभिनंदन केले आहे. चार्टर्ड अकाउंटंट होणे ही अनेक विद्यार्थ्यांची स्वप्ने असतात. मात्र त्यासाठी खूप मेहनत आणि अभ्यातील चिकाटीसह संयमाची आवश्यकताच असल्याची प्रतिक्रिया मेघा गादेकर यांनी दिली.




















