मुंबई – समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण हे ध्येय ठेवत त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद प्रशासनात आहे. त्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेचा उपयोग करावा. राज्याच्या विकासगाथेला पुढे नेण्याची जबाबदारी सार्थपणे सांभाळण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केली.
भारतीय प्रशासकीय सेवेतील २०२४ च्या तुकडीतील आठ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी वर्षा निवासस्थानी संवाद साधला. प्रशासनात आलेल्या तुकडीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करत नागरिक केंद्रित व जबाबदार प्रशासन व्यवस्था निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्र हे सर्वात जास्त नागरीकरण झालेले राज्य आहे. राज्यामध्ये ग्रामीण आणि नागरी विकास केंद्रित प्रशासन गरजेचे आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांकडे नागरी प्रशासनात मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी आहे.संतुलित व सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन १०० सुधारणा करीत आहे. या सुधारणांसाठी ‘ वॉर रूम’ तयार करण्यात आली आहे. महसूल सुधारणांसाठी सल्लागार नेमण्यापेक्षा प्रशासनातील दांडगा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा खूप चांगला परिणाम दिसून येत आहे, असे सांगून ते म्हणाले,’ शासनाने औद्योगिक प्रयोजनासाठी राज्यामध्ये अकृषक परवाना काढण्याची मोठी सुधारणा नुकतीच केली आहे. वेळखाऊ आणि क्लिष्ट प्रक्रिया दूर करीत राज्यात गतिमान प्रशासन देण्यावर शासनाचा भर आहे. महसूल विभाग अंतर्गत बरीच प्रक्रिया, सेवा ब्लॉक चेन पद्धतीवर आणण्यात येत आहे. त्यामुळे बऱ्याच प्रक्रिया जलद व अचूक होत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दुर्गम, नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोलीची ओळख आता ‘स्टील सिटी’ म्हणून होत आहे. या जिल्ह्यात तीन लाख कोटींचे सामंजस्य करार उद्योगांसाठी करण्यात आले आहेत. समृद्धी महामार्गाने राज्याची राजधानी व उपराजधानी जोडली आहे. त्यामुळे गतीने दळणवळण यंत्रणा निर्माण झाली आहे. असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचा परिचय करून घेतला. त्यांचा आतापर्यंतचा प्रवास, मागील अनुभव, महाराष्ट्रात काम करत असताना जाणवलेल्या चांगल्या बाबी, सुधारणा करणे गरजेचे असलेल्या बाबी याविषयीही संवाद साधला.






















