पंढरपूर – बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि आघाडीने घेतलेल्या घवघवीत यशा नंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भारतीय जनता पार्टीचे वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला. बिहार विधानसभा निकालाचा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकी मध्ये आम्हाला चांगला फायदा होवून पंढरपूरसह राज्यात सर्वत्र भाजपाला घवघवीत यश मिळेल असा विश्वास भाजपाचे सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष तथा पंढरपूर पालिका निवडणूकीचे प्रभारी प्रणव परिचारक यांनी व्यक्त केला.
बिहार विधानसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यानंतर गुरुवारी (ता.१४) सकाळ पासून प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ झाला. सुरुवाती पासूनच भाजपा प्रणित एनडीएने निकाला मध्ये आघाडी घेण्यास सुरुवात केलेली होती. दरम्यान दुपार पर्यंत निकालाचे स्पष्ट कल हाती येऊ लागल्या नंतर येथील भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.

शहरातील मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौका मध्ये भाजपाच्या वतीने पेढे आणि साखर वाटून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रणव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली यांनी आनंद उत्सव साजरा केला. यावेळी भाजप शहराध्यक्ष रोहित लाला पानकर, तालुकाध्यक्ष सुभाष मस्के,भाजपा किसानसेलचे माऊली हळणवर आदी प्रमुख भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही भाजपलाच घवघवीत यश मिळेल असा विश्वास देखील या निमित्ताने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणव परिचारक यांनी व्यक्त केला. यावेळी शहर आणि तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















