पंढरपूर – येत्या नगरपालिका निवडणूकी मध्ये भाजपा मधून जुन्या निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी जुन्या भाजपा मधील निष्ठावंतांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात गुरुवारी या मंडळींनी बैठक आयोजित केलेली होती. या बैठकीस आमदार समाधान आवताडे यांनी देखील उपस्थिती लावलेली होती. दरम्यान जर भाजपाकडून जुन्या निष्ठावतांना उमेदवारी डावलली गेली तर बंडखोरी करण्याचा इशारा देखील या मंडळींकडून देण्यात आला आहे.
पंढरपूर नगरपालिका निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने भाजपच्या जुन्या प्रमुख निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी (ता.१३) येथील बाबासाहेब बडवे यांच्या निवासस्थानी पार पडली. यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीस पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर शहरासाठी एकूण १५ कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी अधिकृत पक्षाच्या चिन्हावर (कमळ) निवडणूक लढविण्यासाठी रितसर मागणी केली.
दरम्यान या बैठकीत आमदार समाधान आवताडे यांनी आपली भूमिका पक्षासमोर ठेवून जास्तीत जास्त उमेदवारांना ( जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना) उमेदवारीसाठी पक्ष नेतृत्वाकड आग्रही मागणी करून प्रयत्न करू असा ठाम विश्वास या बैठकीत व्यक्त केला. जर निष्ठावंतांना उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करण्याचा इशारा यावेळी अनेकांनी व्यक्त केला.
या बैठकीस पंढरपूर शहरातील जुने निष्ठावंत कार्यकर्ते माजी शहराध्यक्ष दत्तासिंह राजपूत, उमेश वाघोलीकर, बाबासाहेब बडवे, काशिनाथ थिटे, सुरेशराव खिस्ते, शिरीष कटेकर, वालचंद जामदार-गुजराथी, शाम तापडिया, शकुंतला नडगिरे, रेखाताई कुलकर्णी, अपर्णा तारके, शशिकांत सुगंधी, विदुल अधटराव, आदित्य जोशी, आण्णा धोत्रे, अनुप देवधर, गिरीष आराध्ये, सुरेंद्र कवठेकर, डॉ. शशिकांत धायतडक, विकास शिंदे, अरूण पिंपळनेरकर, संजय पालकर, नितीन करंडे, कैलास कारंडे, बापू लिगाडे, सौरभ थिटे, धनंजय बडवे, वरदसिंह राजपूत, गोलू लखेरी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















