सोलापूर : महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी डफरीन चौक येथील जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी कार्यालयाची पाहणी केली. येथील कामकाजाचा आणि
प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. प्रलंबित प्रकरणांचा
जलद गतीने निपटारा करावा. वेळेत निपटारा न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले.
सोलापूर महापालिकेतील संबंधित विभागाकडून जन्म मृत्यू दाखले आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी डफरीन चौक येथील महापालिकेच्या जन्म – मृत्यू नोंदणी कार्यालय तसेच महापालिकेतील अभिलेखापाल कार्यालयास भेट दिली. सर्व कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपायुक्त आशिष लोकरे , अंतर्गत लेखा परिक्षक राहुल कुलकर्णी, डॉ. मंजिरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
या कार्यालयातील नागरिकांना त्यांच्या कामांसाठी अनावश्यक विलंब न होऊ देणे आणि प्रकरणांचा निपटारा जलद गतीने करणे आवश्यक आहे. त्यानंतर आयुक्तांनी महापालिकेतील अभिलेखापाल कार्यालय येथे भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी असलेले रजिस्टर, त्याची नोंदणी इत्यादीची माहिती घेतली. त्यांनी कार्यालयातील कामकाजाची व्यवस्था आणि नोंदणी प्रक्रियेचा आढावा घेतला.
नागरिकांना उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी आणि प्रकरणांचा निपटारा जलद गतीने करण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत, अशा स्पष्ट सूचनाही आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी यावेळी दिल्या.


















