सांगोला – समाजातल्या असंख्य प्रश्नांना आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजासमोर मांडणारे पद्मश्री नारायण सुर्वे हे प्रतिभावंत कवी होते. असंख्य कवितांच्या माध्यमातून स्वतःच्या जगण्यातलं वेदनामय चित्रण त्यांनी आपल्या कवितेत मांडलं. त्यांची कविता अंधारात चाचपडणाऱ्या व हतबल झालेल्या युवकाला प्रकाशाची वाट आहे. म्हणूनच सुर्वेंची कविता म्हणजे शोषितांचा आवाज आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले. ते सांगोला विद्यामंदिर येथे पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या काव्य जागर व पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदाम भोरे, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, काळया मातीत मातीत तिफन चालते या गीताचे गीतकार डॉ.विठ्ठल वाघ, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कल्याणराव शिंदे, डॉ.द.ता.भोसले यांच्या सहचारिणी प्रा.स्वाती भोसले, कवयित्री स्मिता पाटील, ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा इंगोले, प्राचार्य अमोल गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाजीराव सातपुते यांनी पद्मश्री नारायण सुर्वे यांचा जीवन परिचय दिला. त्यानंतर काव्य जागर या कार्यक्रमात जयश्री श्रीखंडे, प्रतिमा काळे, रजनी कानडे, राजेंद्र वाघ, कुमार खोंद्रे, स्मिता पाटील, सुधीर इनामदार, इंद्रजीत घुले व मानसी चिटणीस यांनी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे सादरीकरण केले. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. याप्रसंगी डॉ.विठ्ठल वाघ यांच्या आवाजात काळ्या मातीत मातीत तिफन चालते या कवितेने सभागृह मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिगंबर ढोकळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण सुर्वे साहित्य व कलाकादमीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
यांचा झाला सन्मान
पद्मश्री नारायण सुर्वे संस्कारक्षम संस्था-सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला, पद्मश्री नारायण सुर्वे जीवन गौरव पुरस्कार-कवी विठ्ठल वाघ, मास्तरांची सावली पुरस्कार-प्रा.स्वाती भोसले, काव्यप्रतिभा पुरस्कार-कवयित्री डॉ.स्मिता पाटील, साहित्य पुरस्कार-डॉ.सागर भजनावळे यांचा कुंपण व कवी सुधाकर इनामदार यांचा माझे दगडाचे हात पुस्तकासाठी


















