पंढरपूर – स्थानिक संशोधक डॉ. संतोष द. डोंगरे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयात सौर जल-क्षारीकरण प्रणाली (Solar Desalination System) या संशोधन विषयावर आपला पीएच.डी. संशोधन प्रबंध यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. या संशोधन चे सादरीकरण ८ ऑगस्ट २०२५ रोजी ओरिएंटल युनिव्हर्सिटी, इंदौर येथे करण्यात आले. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी नवनियुक्त कुलगुरू प्रा. (डॉ.) अमोल गोरे यांचे हस्ते डिग्री प्रदान झाली
या संशोधनासाठी त्यांनी प्रा. (डॉ.) एस. के. सोमाणी, माजी कुलगुरू, ओरिएंटल युनिव्हर्सिटी इंदौर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सह-मार्गदर्शक प्रा. (डॉ.) एच. एस. पाटील, प्राचार्य, GIDC कॉलेज, नवसारी (गुजरात) यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.
डॉ. संतोष द. डोंगरे यांचे संशोधन हे पिण्यायोग्य पाण्याच्या टंचाईच्या समस्येवर उपाय शोधणारे असून, सौर ऊर्जेचा वापर करून समुद्रातील अथवा खाऱ्या पाण्यापासून स्वच्छ व शुद्ध पाणी मिळविण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
या अभिनव संशोधनात सौर परबोलिक डिश (Solar Parabolic Dish), घरगुती कुकर (Domestic Cooker) आणि कॉम्पॅक्ट कंडेन्सर (Compact Condenser) यांचा एकत्रित वापर करून एक नवीन हायब्रिड डीसेंलिनेशन सिस्टम विकसित करण्यात आले आहे.
या संशोधनामुळे ग्रामीण भागात कमी खर्चात शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे शक्य होऊ शकते. तसेच हे तंत्रज्ञान पर्यावरणपूरक आणि ऊर्जा-कुशल असल्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या कार्यासाठी सतत प्रेरणा देणारे पंढरपूर येथील रहिवासी प्रा. (डॉ.) अतुल अ. सागडे (रिसर्च सायंटिस्ट, थॉम्पसन रिसर्च लॅब, एरिका, इटली) यांचे योगदानही महत्त्वाचे आहे.
या यशाबद्दल डॉ. डोंगरे यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील संशोधन व कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


















