सोलापूर – राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर गाजलेल्या विविध खटल्याचे विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्वल निकम यांची प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने बुधवार दि. 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.25 वाजता श्री शिवछत्रपती रंगभवन मध्ये आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा रेणुका महागांवकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली.
माझा जीवन प्रवास जळगाव ते दिल्ली व्हाया मुंबई या अंतर्गत पद्मश्री खासदार अॅड उज्वल निकम यांची मुलाखत होणार असून माधव देशपांडे हे मुलाखत घेणार आहेत. जळगावचे सुपुत्र असलेले अॅड उज्वल निकम यांनी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील पोलीस शिपाई धुळा कोळेकर या गाजलेल्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून मोठी जबाबदारी पार पाडली होती. त्याचबरोबर त्यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात तसेच राज्यातील आणि देशातील विविध खटल्यात सरकारची बाजू त्यांनी योग्य प्रकारे मांडून पिडीतांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याने भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सध्या ते राज्यसभेचे सदस्य असून खासदार म्हणून त्यांनी नुकतेच कामकाज सुरू केले आहे. अशा या देशभक्ताचा जीवनप्रवास कसा आहे याचा उलगडा होवून आजच्या पिढीला मार्गर्शक ठरणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबवण्यात येतात दरवर्षी दिपावलीच्या निमित्ताने ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांची प्रवचनमाला, महाराष्ट्राचे प्रतिभावंत साहित्यिक कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या कथा, कवितांवर आधारीत विंदा एक स्मरणसाखळी हा बहारदार कार्यक्रम तसेच महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले आणि दुबईत मसाला किंग म्हणून ओळख निर्माण करणारे धनंजय दातार यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम सोलापूरातील उद्योजकांना मार्गदर्शक ठरला.
मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी लेखन केलेल्या दोन पुस्तकाचे प्रकाशन अगदी थाटात करण्यात आले. त्यानंतर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वृत्तनिवेदिका, सुप्रसिध्द निवेदिका ज्योती आंबेकर यांचे भाषण कला शिबीर हे शिबीर आणि महिलांसाठी राज्यस्तरीय पाककला शिबीर त्याचबरोबर सोलापूरचे सुपुत्र असलेले राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील सोलापूरच्या सुपुत्रांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सोलापूर रंगे नेत्यांच्या संगे, महाकवी गदि माडगुळकर यांच्या स्मृती निमित्त काव्य जागर कार्यक्रम, महिलांसाठी श्रावण महोत्सव, श्री सूक्त ते राष्ट्र सूक्त, कवी अशोक नायगावकर यांच्या कवितांचा कार्यक्रम, बागेश्वरधामचे महाराज बागेश्वरबाबा यांचे प्रवचन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यातूनच बुधवार दि. 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.25 वाजाता शिवछत्रपती रंगभवन येथे पद्मश्री उज्वल निकम यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरीकांनी मोठ्यासंख्येने उपस्थिती राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष प्रा.दीपक देशपांडे, कार्यवाह जितेश कुलकर्णी,कोषाध्यक्ष अमोल धाबळे,कार्यकारणी सदस्य प्रकाश मोकाशे, पृथा हलसगीकर, मेधा कुलकर्णी, अभय जोशी, अविनाश महागांवकर, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर आदी कार्यरत आहेत.


















